व्यवस्थापन प्रतिनिधी निवडणुकीत "फिफ्टी फिफ्टी'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी गटात निवडून आलेले उमेदवार. (डावीकडून) श्‍यामकांत देशमुख, संदीप कदम, डॉ. राजेंद्र विखे आणि डॉ. सोमनाथ पाटील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी गटात निवडून आलेले उमेदवार. (डावीकडून) श्‍यामकांत देशमुख, संदीप कदम, डॉ. राजेंद्र विखे आणि डॉ. सोमनाथ पाटील.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत एकता पॅनेलचे डॉ. सोमनाथ पाटील, प्रा. श्‍यामकांत देशमुख आणि प्रगती पॅनेलचे संदीप कदम, राजेंद्र विखे पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत चार जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते.

व्यवस्थापन प्रतिनिधीच्या चार आणि नोंदणीकृत पदवीधरच्या दहा अशा चौदा जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरवातीला व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघाची मतमोजणी झाली. सर्व चार जागांचा निकाल साडेदहाच्या सुमारास हाती आला. यात पहिल्याच फेरीत डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे डॉ. सोमनाथ पाटील हे 56 मतांनी विजयी झाले. पुढील तीन फेऱ्यांत कुणाचाही विजय झाला नाही.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. श्‍यामकांत देशमुख यांना पहिल्या फेरीत 32 मते मिळाली. नंतर त्यांना पाटील यांची तीन, राजीव जगताप हे पराभूत झाल्याने त्यांची दोन आणि दीपक शहा यांची चौदा मते मिळाल्याने ते दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाले. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संदीप कदम हे 45 आणि नगर जिल्ह्यातील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉ. राजेंद्र विखे हे 42 मतांनी विजयी झाले. प्रगती पॅनेलचेच उमेदवार अशोक सावंत यांना विखे यांच्या खालोखाल मते मिळत होती. परंतु त्यांच्यासह एकता पॅनेलचे दीपक शहा हे पराभूत झाले. या निवडणुकीसाठी 228 पैकी 225 मतदारांनी मतदान केले. मतमोजणीत 20 मते बाद झाली.

तूर्तास प्रगती पॅनेलचेच वर्चस्व
अधिसभेतील व्यवस्थापन प्रतिनिधी या गटात आता प्रगती पॅनेलचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॅनेलमधील उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आधीच बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यामुळे प्रगती पॅनेलचे तीन आणि एकता पॅनेलचे दोन अशी स्थिती आहे. परंतु, अजूनही नोंदणीकृत पदवीधर गटाची मतमोजणी आणि प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक या गटातील मतदान व्हायचे आहे. त्यानंतरच अधिसभेवर कुणाचा झेंडा फडकणार हे निश्‍चित होईल.

पहिल्यांदाच निवडणूक लढविली. त्यामुळे मनापासून काम केले. यात सर्वाधिक मतांनी निवडून येईल, असे वाटले नव्हते. विद्यार्थ्यांसाठी काही तरी करायचे आहे. अभ्यासक्रमाच्या फेरचनेबाबत काम करणार आहे.
- डॉ. सोमनाथ पाटील

विद्यार्थी आणि संस्थाचालक, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. विद्यापीठाचा 700 कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- प्रा. श्‍यामकांत देशमुख

आमचा विजय एकसंघ प्रयत्नाचा आणि संस्थाचालकांचा आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी कोणती ध्येय धोरणे राबविता येतील, त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास कटिबद्ध राहू.
- संदीप कदम

ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि संस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी लढत राहू. एकजुटीने अधिसभेत काम करून शैक्षणिक दर्जा वाढीसाठी काम करीत राहू. यात विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य असेल.
- डॉ. राजेंद्र विखे पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com