शवविच्छेदनासाठी लागले पाच तास

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मंचर रुग्णालयातील प्रकार; नारायणगावाहून कर्मचारी पाठविण्यास टाळाटाळ

मंचर (पुणे) : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाने शवविच्छेदन करणारा कर्मचारी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मंचर रुग्णालयात तब्बल पाच तास प्राचार्य गुंडेराव बाबूराव इरवाडकर (वय 56) यांचा मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता.

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इरवाडकर कार्यरत होते. हन्नूर (ता. अक्कलकोट) हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांची मुलगी प्रज्ञाचे लग्न सोमवारी (ता. 6) भुसावळ येथे झाले. शुक्रवारी (ता. 10) सकाळी सातला इरवाडकर व त्यांची पत्नी सुषमा अवसरी बुद्रुक येथे घरी आल्या. थोड्या वेळानंतर इरवाडकर यांना चक्कर आल्याने ते झोपले. त्यांची हालचाल थांबल्याचे पाहून सुषमा यांनी आरडाओरड केली. मदतीसाठी आलेल्या गावकऱ्यांसमवेत त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले. ते मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मृतदेह गावी हन्नूरला नेण्यासाठी सात ते आठ तास लागतील. त्यामुळे शवविच्छेदन लवकर करावे, अशी विनंती मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांना सरपंच संगीता हिंगे, उपसरपंच किशोर हिंगे, बाळासाहेब हिंगे, वसंत हिंगे यांनी केली. देशमुख यांनी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला; पण दुपारी बारा वाजले तरीही कर्मचारी मंचरला आला नव्हता. नारायणगावचे वैद्यकीय अधीक्षक एन. डी. सुरवसे हे कर्मचाऱ्याला परवानगी देत नव्हते. पोलिस उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे यांनीही नारायणगावला संपर्क केला; पण प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक रुद्राजी शेळके यांना सदर प्रकार सांगितला. शेळके यांनी सुरवसे यांना जाब विचारल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला मंचरला जाण्यास परवानगी मिळाली. दुपारी एक वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात मिळाला.

दरम्यान, डॉ. सुरवसे यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी विद्यालयाचे विश्वस्त शांताराम हिंगे, गौतम रोकडे, शिवाजी हिंगे व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: pune news manchar five hours to body post mortem