मुलीच्या पोटातून काढला सुमारे दहा किलोचा गोळा

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 23 मार्च 2018

आपलीच मुलगी समजून सगळेजण अनूची काळजी घेत होते. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ. देवमाने हे आमच्यासाठी देवदूत ठरले आहेत. आमच्याकडून एकही पैसा रुग्णालयाने घेतला नाही. तिला कपडेही घेतले. आम्ही आयुष्यभर सर्वांची आभारी राहू.
- अनसूया माळी, अनूची आई

मंचर उपजिल्हा रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया; डॉक्‍टरांचे प्रयत्न

मंचर (पुणे): पोट दुखत असल्याने मंचर उपजिल्हा रुग्णालयात शेत मजूर कुटुंबातील अनू माळी या 15 वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आले. तपासण्या केल्यानंतर ती मासांची मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करत डॉ. अंबादास देवमाने यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने नऊ तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर तब्बल नऊ किलो 670 ग्रॅम वजनाचा गोळा (ट्यूमर) बाहेर काढला.

मूळचे सटाणा येथील माळी कुटुंब कळंब (ता. आंबेगाव) येथे वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनूचे पोट दुखत होते. पण योग्य निदान होत नव्हते. शस्त्रक्रियेसाठी पैसेही नव्हते. पुढील तपासण्या व शस्त्रक्रियेसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला डॉक्‍टर देवमाने यांनी दिला. हे ऐकून मुलगी व तिच्या आईच्या डोळ्यांत पाणी आले. तिच्यावर उपचार झाले नाही, तर तिची प्राणज्योत मालवणार या चिंतेने डॉ. गणेश पवार व डॉ. देवमाने यांनी येथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांनी शस्त्रक्रियेला परवानगी देऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. बी. जे. मेडिकल कॉलेजचे (पुणे) प्रा. डॉ. पी. एस. करमरकर, डॉ. पी. व्ही. रनबागले, डॉ. सदानंद राऊत यांचे मार्गदशन घेतले. डॉ. देवमाने, डॉ. संजय कुमार भवारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली जाधव, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. वृषाली इमेकर, डॉ. मनीष मोरे यांनी शस्त्रक्रिया सुरू केली. सर्वजण चिंतेत होते. बरेचसे अवयव गाठीला चिकटलेले होते. गोळ्याला चिकटलेले एक एक अवयव सरकावण्याचे काम सुरू होते. त्यासाठी खूप वेळ लागत होता. नऊ तासांनंतर नऊ किलो 670 ग्रॅमचा गोळा बाहेर काढला. ती शुद्धीवर आल्यानंतर डॉक्‍टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 23) डॉ. देवमाने यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच सुनीता कराळे उपस्थित होत्या.

दुर्मिळ शस्त्रक्रिया
देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. असाच काहीसा अनुभव अनूच्या बाबतीत येथील डॉक्‍टरांना आला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही अवयवांना इजा न करता हा गोळा काढण्यात आला. डॉ. देवमाने म्हणाले, संपूर्ण जगात "retroperitoneal teratoma' हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या फार दुर्मिळ आहे. आतापर्यंत कमी वयाच्या व्यक्तीत एवढ्या मोठ्या आकाराचा गोळा फक्त दहा व्यक्तीमध्ये आढळून आलेला आहे. जोखीम पत्करून अनूवर शस्त्रक्रिया करण्याचे धैर्य सर्वांनी दिले.

Web Title: pune news manchar hospital girl health tumors operation