विद्यार्थ्याला इंजेक्शन दिले अन् जागेवरच मृत्यू झाला...

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मंचर (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन विद्यार्थी कुलदीप मारूती राक्षे (वय १६, रा. पिंपळगाव-खडकी, ता. आंबेगाव ) बरा झाला होता. त्याला घरी सोडण्याच्या तयारीत असतानाच शेवटचे इंजेक्शन हाताच्या मनगटाच्या शिरेत देत असताना त्याचा जागेवरच मृत्यु झाला. सोमवारी (ता. ६) सदर प्रकार घडला. मंगळवारी (ता. ७) पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे लावून शवविच्छेदन केले. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टर व परिचारिकेच्या निष्काळजी पणामुळे कुलदिपचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे.

मंचर (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन विद्यार्थी कुलदीप मारूती राक्षे (वय १६, रा. पिंपळगाव-खडकी, ता. आंबेगाव ) बरा झाला होता. त्याला घरी सोडण्याच्या तयारीत असतानाच शेवटचे इंजेक्शन हाताच्या मनगटाच्या शिरेत देत असताना त्याचा जागेवरच मृत्यु झाला. सोमवारी (ता. ६) सदर प्रकार घडला. मंगळवारी (ता. ७) पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे लावून शवविच्छेदन केले. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टर व परिचारिकेच्या निष्काळजी पणामुळे कुलदिपचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे. मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

पिंपळगावच्या श्रीराम विद्यालयात कुलदीप इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. त्याला विषमज्वर (टायफाइड) आजार झाला होता. गुरुवार (ता. २) पासून त्याच्यावर हॉस्पिटल मध्ये दररोज उपचार सुरु होते. त्याला दररोज संध्याकाळी घरी घेऊन त्याचे वडील मारूती राक्षे पुन्हा दुसऱया दिवशी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन येत होते. कुलदीपच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणले होते. आता परत उपचारासाठी कुलादिपला हॉस्पिटलमध्ये आणण्याची गरज नाही. तो बरा झाला आहे. असे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले. शेवटचे सलाईन संपले होते. शीरेवाटे इंजेक्शन चढवत असताना अचानकपणे त्याच्या मनगटाजवळ फुगा तयार झाला. त्यानंतर कुलदीपने प्राण सोडला, असे कुटुंबीयांनी सांगितले.

कुलदीप हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. स्कॉलरशिप परीक्षा व क्रीडा स्पर्धेत त्याने अनेक बक्षिसे मिळविली होती. त्याच्या आकस्मिक मृत्यू मुळे हळहळ व्यक्त केली जाते. मंगळवारी दुपारी कुलदीप वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय होता. श्रीराम विद्यालय व गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कुलदीपच्या मृत्यूची चौकशी पोलिसांनी करावी. संबधित परिचारिका व डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेचे पुणे जिल्हा चिटणीस सचिन बांगर यांनी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news manchar studend dead after injection