मांजावर बंदी घालण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे - चिनी नायलॉन मांजाची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या हद्दीत मांजा विक्रीवर बंदी घालावी, अशा अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

गळ्याभोवती चिनी मांजा अडकून झालेल्या घटनेत "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबरोबरच मांजामुळे एक तरुणही गंभीर जखमी झाला होता. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून मांजावर बंदी घालून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

मांजामुळे अपघात होण्याच्या घटना पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये होत आहेत. त्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बंदी घालूनही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. महापालिका व पोलिस प्रशासन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: pune news manja ban dr neelam gorhe devendra fadnavis