मराठा समाजाचा मुंबईत बुधवारी "मूक क्रांती मोर्चा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाना आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाचे संयोजक शांताराम कुंजीर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कुंजीर म्हणाले, 'मराठा समाजातर्फे वारंवार मागण्या करूनही त्यांच्या प्रश्‍नांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे. मात्र शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी या राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा जिजामाता उद्यान येथून सकाळी अकरा वाजता निघणार आहे. इतर मोर्चांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होईल. आतापर्यंत पाळण्यात आलेली शिस्त व संयम या मोर्चामध्येही कायम राहणार आहे.''

हा मोर्चाही मूक असणार आहे. मात्र या नंतरदेखील सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात उग्र स्वरूपाचे मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Web Title: pune news maratha kranti morcha in mumbai