चिनी मांजा विक्रेत्यांना बसणार चाप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - चिनी मांजाची विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने आखलेल्या "स्वच्छतेच्या उपविधी'त कारवाईचे स्वरूप आणि दंडाच्या रकमेचा समावेश करून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी जाहीर केले. पोलिस यंत्रणेशी समन्वय राखून मांजा विक्री, साठा आणि निर्मिती करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची सूचनाही महापौरांनी अतिक्रमण खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. 

पुणे - चिनी मांजाची विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने आखलेल्या "स्वच्छतेच्या उपविधी'त कारवाईचे स्वरूप आणि दंडाच्या रकमेचा समावेश करून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी जाहीर केले. पोलिस यंत्रणेशी समन्वय राखून मांजा विक्री, साठा आणि निर्मिती करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची सूचनाही महापौरांनी अतिक्रमण खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. 

दुचाकीवरून जात असताना मांजाने गळा कापल्याने "सकाळ'मधील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा नुकताच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच, मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर मांजा विक्रीच्या बंदीबाबत भूमिका ठरविण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, "आरपीआय'च्या गटनेत्या सुनीता वाडेकर, नगरसेवक महेश लडकत, अजय खेडेकर, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, अतिक्रमण खात्याचे प्रमुख माधव जगताप, सहायक पोलिस अधिकारी आरती खेतमाळीस यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

मांजाबंदीसाठी स्वतंत्र धोरण आखून त्याच्या अंमलबजावणीसाठी समिती नेमण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मांजाची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना कराव्यात, पतंग उडविण्यासाठी जागा निश्‍चित कराव्यात, अशा घटनांबाबत शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी आदी सूचना या वेळी नागरिकांनी केल्या. 

महापौर टिळक म्हणाल्या, ""पतंग उडविण्यावर बंदी घालणे शक्‍य नाही. पण, त्यामुळे दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. विशेषत: मांजा विकणाऱ्यांवर वचक राहावा, यासाठी उपविधीत कारवाईचे स्वरूप आणि दंडाचा समावेश करण्यात येईल. त्यानुसार राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला जाईल. त्याची प्रभावीींअंमलबजावणी करण्यात येईल. पतंग उडविण्याकरिता जागा निश्‍चित करण्याचा विचार करू.'' 

उगले म्हणाल्या, ""मांजाची विक्री, साठा आणि त्याची निर्मिती करण्यास बंदी आहे. पण, त्याची विक्री सुरू आहे. अशा विक्रेत्यांचा शोध घेऊन त्याची माहिती पोलिसांना देणार आहोत. त्यासाठी अतिक्रमण खात्यातील अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. मांजा वापरला जाणार नाही, याबाबत जागृती झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. माध्यमांनीही जागृतीची मोहीम सुरू करावी.'' 

""पतंग उडविण्यासाठी नदीपात्रातील जागा उपलब्ध करून देण्याचा विचार व्हावा. पतंग उडविण्यासाठी नदीसुधार योजनेअंतर्गत सुविधा निर्माण करावी,'' अशी सूचना तुपे यांनी केली. 

""रस्ते, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी पतंग उडविण्यास बंदी घालून महापालिकेने मोकळ्या जागेत पतंग महोत्सव भरवावा,'' अशी मागणी नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी केली. 

खेतमाळीस म्हणाल्या, ""मांजा विकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. तरीही, ती होत असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. त्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाकडील दूरध्वनी क्रमांक आणि 100 क्रमांकावर तक्रार करता येतील. त्याची तातडीने दाखल घेतली जाईल.'' 

जागृती मोहीम राबविणार  
चिनी मांजा न वापरण्याबरोबरच वर्दळीच्या ठिकाणी पतंग उडवू नये, याबाबत शहरात जागृती मोहीम राबविण्यात येईल. विशेषत: शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून, मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात येईल. या मोहिमेत प्रत्येकाने सहभागी व्हावे. संस्था आणि संघटनांनी ही मोहीम परिणामकारकरित्या राबवावी, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. या संदर्भातील मोहिमेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पुढाकार घेतील, असे योजनेच्या समन्वयक रूपाली शेठ यांनी सांगितले.

Web Title: pune news marathi Chinese Manza