शब्दसंभार अन्‌ सुरांच्या गुंफणीचा बहार

शब्दसंभार अन्‌ सुरांच्या गुंफणीचा बहार

पुणे - सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं... यासारख्या शब्दसंभाराने नटलेल्या कवितांमधून बा. भ. बोरकरांपासून कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, सुरेश भट आणि कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत अनेक कवी अवतरले आणि शब्दसुरांच्या या बहारदार मैफिलीने मराठी भाषा गौरव दिनाचा प्रसन्न अनुभव दिला.

‘सकाळ’ आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वाङ्‌मय मंडळाने कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त ‘कवितेचा इंद्रधनू’ हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केला होता. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, प्रा. ज्योत्स्ना खरे या वेळी उपस्थित होते. दंतवैद्यक असूनही मराठी भाषेवर निस्सीम प्रेम करणारा कवी, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी कवितांचे अभिवाचन आणि सुरेल गायन करून मराठीतील समृद्ध आणि तजेलदार शब्दछटांची उधळण केली. या शब्दांमध्ये पराग जोशी यांनी गिटारच्या स्वरांची सुरेख गुंफण केली.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी गिरिजा महामुनी हिने गायलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य’ या गौरवगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. मराठीचा रांगडाबाज असलेल्या पोवाड्यातून हेरंब पायगुडे याने महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले वीर, विचारवंत आणि समाजसुधारकांची महती मांडली. त्यानंतर सुमारे दीड तास जावडेकर तसेच ऋषिकेश आणि गौरी या विद्यार्थ्यांच्या कविता अभिवाचनातून मराठी साहित्यातील अनेक कवींचे शब्दरूप रसिकांसमोर उलगडले. इंदिरा संत यांच्या ‘नको नको रे पावसा,’ ‘कपडे धुण्याचे पाणी’, सुरेश भटांच्या ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल’, ग्रेस यांच्या ‘काय झाले गं बोटाला बाई’, अशोक नायगावकर यांच्या ‘तर प्रेयसीने कसे आब राखून राहावे’ अशा अनेक कवितांनी रसिकांच्या मनाला रुंजी घातली. मंदार कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

भाषेवर प्रयोग व्हावेत
आशुतोष जावडेकर म्हणाले, ‘‘मराठी जिवंत ठेवायची असेल, तर भाषेवर प्रयोग झाले पाहिजेत. अन्य भाषांतील अनुवाद मराठीत झाले पाहिजेत. उर्दू, फारसी यांसारख्या भाषा मराठीत मिसळल्या, तशी इंग्रजी भाषादेखील मराठीत मिसळली आहे, त्यात वावगे काहीच नाही.’’ फडणीस यांनी, मराठी भाषा मरणार ही भीती अनाठायी असून, तरुणांच्या मनात ही भाषा आहे. त्यामुळे तिला कोणताही धोका नसल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com