गुजरात निवडणुकीने कॉंग्रेसला बळ - सातव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना भिडण्याची मानसिकता कॉंग्रेसमध्ये गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपकडून सोशल मीडियातून होणाऱ्या प्रचाराला आणि निवडणुकीच्या तंत्राला उत्तर देण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असे मत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले. 

पुणे - प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना भिडण्याची मानसिकता कॉंग्रेसमध्ये गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली. भाजपकडून सोशल मीडियातून होणाऱ्या प्रचाराला आणि निवडणुकीच्या तंत्राला उत्तर देण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असे मत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले. 

डायमंड पब्लिकेशनतर्फे आयोजित "गुजरात 2017 : चित्र, चरित्र आणि चारित्र्य' या पुस्तक प्रकाशनावेळी सातव बोलत होते. राजकीय विश्‍लेषक प्रकाश पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी साम वाहिनीचे संपादक संजय आवटे, लेखक किशोर रत्त्काटे, राजा कांदळकर, नीलेश पाष्टे, राम जगताप आदी उपस्थित होते. 

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसला आहे त्या जागा टिकविता आल्या, तरी खूप मोठी गोष्ट ठरेल, असे विधानसभा निवडणुकीपूर्वी बोलले जात होते, असे नमूद करीत सातव म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून काम करणे कॉंग्रेस नेत्यांच्या मानसिकतेत नव्हते. गुजरात निवडणूक आणि त्यामध्ये मिळालेल्या यशामुळे कॉंग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहू शकतो, याचा आत्मविश्‍वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला. राहुल गांधी हे प्रभावी विरोधी पक्षनेते होऊ शकतात, हे या निवडणुकीत समोर आले. हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांचे मुद्दे महत्त्वाचे ठरले. विकासासाठी देशांत सांगितले जाणारे "गुजरात मॉडेल' हे फक्त मार्केटिंगचा भाग असल्याचे कॉंग्रेसने मतदारांना पटवून दिले. गुजरात निवडणूक ही बदलाची सुरवात आहे.'' 

""प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत होते. भाजपकडून सोशल मीडियामध्ये होणाऱ्या खोट्या प्रचाराला कॉंग्रेसने उत्तर दिले. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्‍वासनांची वस्तुस्थिती कॉंग्रेसने मांडली. हा देश तरुणांचा आहे, तर तरुणांच्या विषयावर काम करणे आवश्‍यक आहे, हे कॉंग्रेसच्या लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जनतेला गृहीत धरून चालणार नाही, हे लक्षात आले. चार वर्षांत एकही पत्रकार परिषद मोदी यांनी घेतली नाही. विचारलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देत नाही, '' अशी टीकाही सातव यांनी केली. 

पुढील काळात धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपकडून पुढे आणला जाईल, अशी भीती आवटे यांनी व्यक्त केली. गुजरातमधील कॉंग्रेसचे यश हे सर्वसामान्यांचा उद्रेक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news marathi news rajiv satav congress