बाजार समितीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी अडत्यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

पुणे - मार्केट यार्डमधील भाजीपाला बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आता अडते असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी, ‘डमीं’ची संख्या, गाळ्यापुढे माल ठेवण्याची मर्यादा इत्यादीबाबत संघटनेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यास बाजार समिती प्रशासनाचे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बाजार समितीच्या आवारातील अडते असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. यात परिवर्तन पॅनेल विजयी झाले. नवीन कार्यकारिणीच्या बैठकीत आणि विभागानुसार अडत्यांशीही बाजारातील प्रश्‍नांवर चर्चा झाली.

त्यानुसार असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि काही मागण्याही केल्या. बाजारात प्राथमिक सोयीसुविधा आणि प्रश्‍न सोडविण्यावर भर द्यावा, अशी भूमिकाही अडत्यांनी घेतली.

बाजाराच्या पुनर्विकासाविषयी असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत निर्णय होईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. 

भाजीपाला विभागातील विक्री दुपारी बारा वाजता बंद करावी. तसेच फळ बाजारातील विक्रीही दुपारी दोनपर्यंत ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बहुतेक अडते गाळ्यासमोर पंधरा फुटाच्या पुढे माल ठेवत असल्याने वाहतूक कोंडी होते. असे करणाऱ्या अडत्यांची बाजू न मांडण्याची भूमिका असोसिएशनने घेतली आहे. 

गाळ्यांवर अडत्यांच्या मदतीसाठी दोन मदतनीस (डमी) ठेवण्याची परवानगी बाजार समितीने दिली आहे. याचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत. गाळ्यावरील जागा भाडे तत्त्वावर देऊन दोनपेक्षा अधिक डमी ठेवले जात आहेत. याच्याविरोधात काही अडत्यांच्या तक्रारी होत्या. या डमींच्या संख्येवर नियंत्रण ठेवून बाजारात चालणाऱ्या किरकोळ विक्रीला मनाई करावी, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे. गाळा असूनही बाजाराच्या आवारातील मोकळ्या जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

अडते असोसिएशनच्या भूमिकेनुसार कार्यवाही केली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अडत्यांवर दंड आकारला जाईल. त्याची रक्कम वाढविण्यात येईल. डमी आणि किरकोळ विक्रीसंदर्भातील नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. फळ बाजारातील सीमाभिंतीलगत असलेल्या सर्व डमींवर रविवारी कारवाई केली गेली आहे. यापुढे पंधरा फुटांच्या पुढे माल ठेवणाऱ्यांचा माल जप्त केला जाणार आहे.
- दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: pune news market committee agent