बाजाराच्या पुनर्विकासाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळे विभागाच्या पुनर्विकास प्रकल्पाला पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भवितव्य पणन मंडळ आणि अडते असोसिएशनच्या भूमिकेवर ठरणार आहे.

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला, फळे विभागाच्या पुनर्विकास प्रकल्पाला पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भवितव्य पणन मंडळ आणि अडते असोसिएशनच्या भूमिकेवर ठरणार आहे.

बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने बाजार आवारात अत्याधुनिक फूल बाजार, कचरा प्रक्रिया प्रकल्प, बहुमजली पार्किंग असे अनेक प्रस्ताव तयार केले. त्यापैकी फूल बाजाराचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब झाला. हे काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढणार याबाबत शंका नाही. एकीकडे काम सुरू असतानाच प्रशासकीय मंडळाने फळे भाजीपाला, कांदा बटाटा विभाग असलेल्या संपूर्ण बाजाराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पाला पणन मंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली असल्याचा दावा बाजार समितीचे प्रशासकीय मंडळ करीत आहे.  

अडत्यांची भूमिका महत्त्वाची 
या प्रकल्पाच्या खर्चाला पणन मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच बाजाराचे प्रत्यक्षात काम सुरू करता येईल. तत्पूर्वी बाजार आवारातील महत्त्वाचा घटक असलेल्या अडत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाजाराच्या पुनर्विकासाला अडत्यांचा विरोध आहे. 

बहुमजली इमारत 
सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारातील गाळे पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभी केली जाईल. सध्याच्या बाजारात केवळ गाळे बांधण्यात आले आहेत. नवीन बाजाराची इमारत बहुमजली असेल. वाहने उभी करण्यासाठी बेसमेंट, त्यावर गाळे आणि वरच्या मजल्यावर अडत्यांची कार्यालये असे या बाजाराचे स्वरूप असेल. सध्या असलेले फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग असे वेगवेगळे विभाग नवीन बाजारात असतील. 

पुनर्विकासाची गरज का?
बाजार समितीने गाळे असलेल्या पाकळ्यांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ केले आहे. यामध्ये गाळे धोकादायक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बाजाराच्या पुनर्विकासावर चर्चा होत आहे. सुमारे अडीचशे एकर क्षेत्र असलेल्या या बाजारात देशातील इतर बाजारातूनही मालाची आवक होते. आवक आणि वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी हा गंभीर विषय बनला आहे. पार्किंगचा प्रश्‍नही भेडसावत आहे. ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजना, पुरंदर येथे होणारे विमानतळ आणि निर्यातीची संधी, बाजारात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्विकास आवश्‍यक असल्याचा प्रशासकीय मंडळाचा दावा आहे.

बाजारातील सर्व घटकांना एकत्रितपणे या प्रकल्पाचे सादरीकरण दाखवावे. यानंतर विशेष सभा बोलावून त्यात सदस्यांची बाजू ऐकून पुढील निर्णय घेतला जाईल. गाळेधारकांना किती रक्कम द्यावी लागेल, जागेचा करार किती वर्षांसाठी केला जाईल, बांधकाम काळात बाजाराची पर्यायी जागा कुठे असेल, अशा अनेक मुद्यांचा खुलासा बाजार समितीने केला पाहिजे.
- विलास भुजबळ, अडते असोसिएशनचे अध्यक्ष

या प्रकल्पाची माहिती सर्व घटकांना दिली जाईल. त्यांच्याकडून हरकती, सूचना मागविल्या जातील. त्याचा विचार करून प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. पणन मंडळाकडेही प्रकल्प मंजुरीचा प्रस्ताव पाठविला जाईल.
- दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: pune news Market Redevelopment Approval