तांदूळ, मिरचीच्या भावात तेजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे - मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात तांदूळ आणि मिरचीच्या भावांत तेजी निर्माण झाली आहे. नेहमीप्रमाणे हंगामाच्या सुरवातीला तांदळाच्या भावांत निर्माण होणारी तेजीची परंपरा या वर्षी कायम राहिली. 

पुणे - मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या घाऊक बाजारात तांदूळ आणि मिरचीच्या भावांत तेजी निर्माण झाली आहे. नेहमीप्रमाणे हंगामाच्या सुरवातीला तांदळाच्या भावांत निर्माण होणारी तेजीची परंपरा या वर्षी कायम राहिली. 

गेल्या महिन्याभरात तांदळाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. विशेषतः 1121 या प्रकारच्या तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. बासमती या प्रकारातील तांदळाची निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळे भाव वधारू लागले आहे. या आठवड्यात त्याचे भाव प्रति क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी वाढले. बासमती कणी या प्रकारातील तांदळाच्या भावातील तेजी टिकून आहे. तुकडा प्रकारातील तांदळाची आवक कमी होत आहे. त्याचा परिणाम इतर तांदळाच्या मागणी आणि भावावर पडत आहे. 

मिरचीच्या बाजारात तेजी निर्माण झाली असून, बहुतेक मिरचीच्या प्रति क्विंटल भावात या आठवड्यात दीड हजार रुपये वाढ झाल्याचे व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले. यंदा मध्य प्रदेशात उत्पादन कमी झाले. गेल्या वर्षी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विक्रमी उत्पादन निघाले होते. भाव कमी मिळाल्याने या वर्षी तेथील लागवडीचे प्रमाण कमी झाले. परिणामी, ही वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

गहू, ज्वारी, बाजरी, शेंगदाणा, साबुदाणा, हळद, गोटा खोबरे, रवा, मैदा, आटा, पोहा, खाद्यतेल आदींची मागणी कमीच राहिली. साखरेच्या भावातील घसरण सुरूच राहिली आहे. खाद्यतेलाच्या बाजारात मागणी आणि पुरवठा स्थिर असल्याने विशेष बदल झाले नाही. आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर राहिला आहे. तांदळाच्या बाजारात तेजी निर्माण झाल्याचा परिणाम पोह्याच्या बाजारावर पडला आहे. गेल्या आठवड्यात मुरमुऱ्याचे भाव वाढले होते. या आठवड्यात पोह्यांच्या भावात पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. 

नारळ महागले 
दक्षिणेकडील राज्यातून पुण्याच्या बाजारात नारळाची आवक कमी होत आहे. उत्पादन कमी असल्याने नवीन तोडणी होत नाही. साफसोल या प्रकारातील नारळाची खाद्यतेल आणि गोटा खोबरे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळे त्याची आवक कमी झाली आहे. या आठवड्यात नारळाच्या भावांत प्रति शेकडा 50 ते 100 रुपयांनी तेजी आली. 

गुळाच्या बाजारात मंदी 
मकर संक्रातीनंतर गुळाच्या बाजारात मंदी निर्माण झाली आहे. गुळाचे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत चांगले उत्पादन होत आहे. साखरेचे भाव घटत असल्याने गुळाच्या बाजारात मंदी निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात महाशिवरात्र आणि होळी पौर्णिमा येत आहे. या दोन सणानिमित्त मागणी वाढली तर तेजी येऊ शकते, अन्यथा आणखी मंदी येण्याचा अंदाज आहे.

Web Title: pune news marketyard rice green chili