'हुतात्मा जवान सौरभ फराटे स्मारकाचे काम लवकरच सुरू'

संदीप जगदाळे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
हडपसर (पुणे): फुरसंगी येथील हुतात्मा जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी लागणा-या जागेसाठी महापौर मुक्ता टिळक यांनी आज (सोमवार) हडपसर येथे तीन जागांची पहाणी केली. जागा निश्चीत झाल्यानंतर प्रशासकीय बाबींची पुर्तता करून लवकरच स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे अश्वासन यावेळी महापौरांनी दिले.

महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
हडपसर (पुणे): फुरसंगी येथील हुतात्मा जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी लागणा-या जागेसाठी महापौर मुक्ता टिळक यांनी आज (सोमवार) हडपसर येथे तीन जागांची पहाणी केली. जागा निश्चीत झाल्यानंतर प्रशासकीय बाबींची पुर्तता करून लवकरच स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे अश्वासन यावेळी महापौरांनी दिले.

हडपसर गाडीतळ उड्डाणपुलाखालील चौक, महापालिकेची कै. रामचंद्र बनकर इलर्निंग स्कुल आणि गंगानगर येथील फराटे यांच्या अंत्यविधी चौथरा स्थळ या तीन जागांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सौरभ फराटे यांच्या आई मंगल फराटे, वडील नंदकुमार फराटे, भाऊ रोहित फराटे, नगरसेवक मारुती तुपे, स्मारकासाठी पाठपुरावा करणारे प्रशांत सुरसे, स्वप्नील धर्मे, पल्लवी सुरसे, नंदू आजोतिकर उपस्थित होते.
याप्रसंगी फराटे यांच्या आईने महापौरांकडे विनंती केली की, महापालिकेच्या बनकर स्कुलमध्येच माझ्या मुलाचे स्मारक व्हावे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना देशभक्तीचे संस्कार व हुतात्मा जवानांविषयी स्मरण होत राहील. तसेच शाळेत स्मारकाचे पावित्र्य राहिल.

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्याकडून झालेल्या हल्ल्यात जवान सौरभ फराटे यांना वीरमरण आले होते. फराटे यांच्या अंत्यविधीच्या प्रसंगी पुणे महापालिकेच्या वतीने स्मारक उभा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दहा महिने उलटून ही स्मारकाच्या विषयाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे युवक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी महापौरांना स्मारकाचे काम सुरू करावे याबाबत निवेदन दिले होते. याप्रसंगी पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर, राजेश महामोनकर, हरी शेलार, स्वप्नील धर्मे, गणेश जगताप, नितीन गावडे, श्रीकांत कळसकर आदींचे शिष्टमंडळ होते. महापौरांनी तातडीने दखल घेवून स्मारकासाठी जागांची पहाणी केली.

आईला गहिवरून आले
स्मारकासाठीच्या जागेची पहाणी झाली. त्यानंतर हुतात्मा जवान सौरभ फऱाटे यांच्या आईने महापौर टिळक यांना घरी येण्याची विनंती केली. व्यस्त कार्यक्रमातूनही महापौरांनी त्यांचा मान राखला. घरी गेल्यानंतर आईने मुलगा सौरभ याचे सैन्यदलात असतानाचे फोटो महापौरांना दाखवीले. ते दाखविताना मुलाच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले. त्या म्हणाल्या, माझा मुलगा देशसेवेसाठी गेला. अंत्यविधीच्यावेळी त्याचे स्मारक उभा करण्याच्या घोषणा राजकीय नेत्यांनी दिले. त्यानंतर एकाही राजकीय कार्यकर्त्याने याबाबत पाठपुरावा केला नाही. स्मारकासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे व त्यांचे सहकारी यांना पाठपुरावा करावा लागतो, याची मला खूप खंत वाटते. वीर जवानांचा सन्मान ठेवून महापौरांनी जागेची पहाणी केली याचा मला आनंद वाटला. मात्र, आता काम लवकर सुर करा, असे सांगताना त्यांना आश्रू थांबवता आले नाहीत.

Web Title: pune news Martyr soldier saurabh pharate Monument work to begin soon