पश्‍चिम घाट विकासाची योजना पुन्हा सुरू व्हावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

आपल्या निसर्गविषयक लेखनाने मराठी साहित्याला समृद्ध व श्रीमंत करणारे साहित्यिक, निसर्गाचा चालता-बोलता इतिहास..अशी खास ओळख असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाला मनमोकळी मुलाखत दिली.

पश्‍चिम घाटाच्या विकासाचा कार्यक्रम मोदी सरकारने बंद का केला?
जैवविविधतने समृद्ध असलेल्या पश्‍चिम घाटाच्या विकासासाठी माधव गाडगीळ यांनी एक योजना तयार केली होती. गाडगीळ हे स्वतः शास्त्रज्ञ असल्याने ती योजना अधिक चांगली झाली आहे. त्यामुळे नव्या सरकारने ती अमान्य करणे चुकीचे आहे. यावरून असे दिसते, की निसर्गाविषयी त्यांना काही ऐकायचे नाही, मग त्यावर काय बोलणार? गाडगीळ यांनी इतकी वर्षे घालवून ती योजना तयार केली. ती नाकारणे चुकीचे आहे. ती योजना पुन्हा सुरू केली पाहिजे. तरच जंगल टिकेल. अन्यथा, जंगल राहणार नाही. 

वन्यविषयक लेखनात मराठीच्या तुलनेत इंग्लिश साहित्य समृद्ध का आहे? 
‘‘मराठी साहित्याच्या तुलनेत इंग्रजीमध्ये वन्यविषयक लेखन अधिक झाले आहे. आपण जंगलात फिरत नाही. फिरायचे असेल, तर तेही फक्त वाघ पाहण्यासाठीच फिरतो. म्हणजेच जंगलाशी आपण प्रामाणिक नाहीत. इंग्रजी लेखक जंगलात भरपूर फिरतात. त्यामुळेच त्यांचे वन्यजीवांविषक साहित्य समृद्ध होते. थोरो यांनी आपल्या पुस्तकासाठी तब्बल पाच वर्षे जंगल निरीक्षणासाठी घालविली.’’

जंगलांसाठी ‘चिपको आंदोलन’सारखी आंदोलने पुन्हा करण्याची वेळ आली आहे का? 
आम्ही जंगलामध्ये अधिकाधिक पाणीसाठे निर्माण करत होतो. त्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होत असे. परिणामी, प्राण्यांची अन्नसाखळी सुस्थितीत असे. आता मात्र वनाधिकारी जंगलांमध्ये पाणीसाठ्यासाठी बांध घालत नाहीत. त्यातच टणटणी या युरोपीय वनस्पती आणि रानतुळस गवत उगवू देत नाही. ती काढण्यासाठी वनाधिकारी प्रयत्न करत नाहीत. या कारणांमुळे हिरव्या गवताची कुरणे संपली. त्यावर आधारित असलेली प्राण्यांची अन्नसाखळी तुटली. खायला अन्न नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही, या कारणांमुळे वाघ, बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी जंगलांमध्ये नैसर्गिक पाणवठे निर्माण करत चारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.’’ 

वनअधिकारी/वनरक्षक त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे का देत नाहीत?
आम्ही विद्यार्थी, अभ्यासकांना जंगल फिरून दाखवायचो. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची आम्ही उत्तर देत होतो. त्यातूनच जंगलाची ओळख व्हायची. आता मात्र जंगल सफरीला येणाऱ्यांना ‘गार्ड’ किंवा वनाधिकारी प्रश्‍न विचारू देत नाहीत. हे चुकीचे आहे. प्रश्‍न विचारलेच पाहिजेत आणि त्याची उत्तरेही दिली पाहिजेत.

मनुष्य व वन्यप्राण्यातील संघर्ष वाढण्याची कारणे काय आहेत?
वाघ, हरिण, अस्वल, बिबट्या यांसारख्या प्राण्यांच्याही अन्न, पाणी व निवारा या गरजा आहेत. आता जंगले तुटत आहेत. जंगलातील नाले, झरे, कुंडांमध्ये पाणी उपलब्ध नाही. परिणामी, चारा नसल्यामुळे प्राण्यांचे हाल होऊ लागले. हरणांनी प्रजनन कमी केल्याने त्यांची संख्या घटली. त्यातच वाघाचे अन्न इतर प्राणी/पक्षी खाऊ लागले. त्यामुळे वाघाला अन्नासाठी जंगलाबाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तीच परिस्थिती बिबट्यांची झाली. ही अन्नसाखळी तुटल्यामुळे वाघ, बिबट्यासारखे प्राणी मनुष्यवस्तीत येतात. तेथे त्यांना दगड-धोंड्यांचा मार खाण्याची वेळ येते. 

आदिवासींकडून शेतीचे प्रमाण वाढू लागल्याने जंगले तुटतायेत का?
आम्ही आदिवासींची गावे जंगलामध्ये वसविली. त्या पद्धतीने ‘फॉरेस्ट व्हिलेज’ वसले पाहिजे. ही व्यवस्थाच आता बंद झाली. जंगलांना आग लागते तेव्हा ती विझविण्यासाठी माणसे येत होते. आता ती माणसे येत नाहीत. आदिवासींचे हक्क मान्य केले पाहिजेत. आदिवासी हेच जंगलाचे संरक्षण करतात. आदिवासी मोहाची फुले व तेंदूच्या पानासाठी आग लावतात. मात्र ती तात्पुरती असते. वेगवेगळ्या कारणांमुळे जंगलांना लागणारे वणवे विझविण्यासाठी जंगलाच्या सीमारेषेवर ‘फायरलाइन’ असे. आता ती व्यवस्थाही शिल्लक नाही. 

पर्यावरणाविषयीची जाणीव कमी होतेय का? तरुण पिढीने त्यासाठी काय करावे?
विवेक देशपांडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना जंगल ओळख व्हावी, यासाठी २५ वर्षे घालविली. असे खूप थोडे लोक आहेत. आता एखाद्या अभिनेत्याला पकडून आणतात आणि ‘टायगर सिटी’ करा असे म्हणतात. आता लोक फक्त वाघ बघण्यासाठी जंगलात जातात. त्यापेक्षा जंगलात फिरून तेथील अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे निरीक्षण क्षमता वाढेल. निसर्गाविषयीचे कुतूहल दूर होईल. वनाधिकाऱ्यांनीही पर्यटकांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. 

Web Title: pune news maruti chitampalli interview Western Ghats Development