खांडगेंच्या सौरदिव्यांनी उजळणार कळकराईचा आदिवासी पाडा

रामदास वाडेकर
शुक्रवार, 7 जुलै 2017

'सकाळ'ने या वस्तीची व्यथा वेळोवेळी मांडली आहे. सकाळची बातमी वाचून त्याआधारे या संपूर्ण गावाला सौरदिवे दिल्याचे गणेश खांडगे यांनी सांगितले. 

टाकवे बुद्रुक : गावात वीजेचा खांब आहे, पण वीज नाही. घरात दिवा आहे, पण त्यात घासलेट नाही. त्यामुळे पावसाळयातील  चार महिन्याची रात्र  मिणमिणत्या पणतीच्या उजेडात काढावी लागते. माजघर उजेडात आणि बाकी आख्खा गाव अंधारात असे पिढ्यानपिढ्या कळकराईत सुरू आहे. जिथे गणपती, दसरा आणि दिवाळीचा सणही अंधारात जातो. तो आदिवासी पाडा किमान यापुढे पाच वर्षै प्रकाशात उजळून निघणार आहे. कारण मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेने कळकराईतील ४३ कुटुंबाना पद्मविभूषण शरद पवार यांच्या उपस्थितीत व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सौरदिवे सप्रेम भेट देण्यात आले.  

या सौरदिव्यांमुळे माय माऊल्यांची, विद्यार्थी आणि बळीराजाची सोय होणार आहे. तळेगावातील सामाजिक कार्याचा वसा लाभलेल्या खांडगे परिवाराने या वस्तीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दऱ्या खोऱ्यात आणि  सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आदिवासी पाडा अशी कळकराईची ओळख, गावातील ४३ कुटूंबे निसर्गाशी दोन हात करून जगत आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर डोंगरात हे गाव. जितकी चढण चढून वर मावळ तालुक्यात यायचे तितकाच उतार उतरून कर्जत तालुक्यात मोल मजूरीला आणि रोजंदारीवर जायचे. गावात चौथीपर्यंतच काय ती शिक्षणांची सोय. आरोग्याच्या बाबतीत न बोलले बरे, रुग्णाला झोळीत टाकून किमान १० किलोमीटर चालायचे, पावसाळ्यात कधी दरड पडून माळीण घडले याचा काय नियम नाही. त्यामुळे आपल्या लेकरांना विकास आणि प्रगती ही नावेच गावात कोणत्याही आई वडिलांनी दिली नाही.

ती 'कळकराई' ही आदिवासी वस्ती विकासापासून कोसो मैल दूर आहे. दहा वर्षांपूर्वी गावात वीज पोचली खरी, पण सावळा ते कळकराईपर्यंत विजेचे खांब उतारून पोचले. पावसाळ्यात वीजवाहक तारा घासून स्पार्किंग होऊन वीज गायब होते. अपुऱ्या दाबाने गावात वीज पुरवठा होतो. पावसाळ्यात चार महिने गावात अंधार असतो. उन्हाळा आणि हिवाळा फार समाधानकारक आहे. असे नाही कधी गावात वीज असते तर कधी नसते. गणपती, दसरा, दिवाळी अंधारात जाते. कधीतरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली तर वीज पुरवठा होतो. किमान चार सहा महिने गाव अंधारातच असते. वीजेअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी गणेश खांडगे यांनी संपूर्ण गावाला सौरसंच देण्याचा उपक्रम राबविला आहे. 'सकाळ'ने या वस्तीची व्यथा वेळोवेळी मांडली आहे. सकाळची बातमी वाचून त्याआधारे या संपूर्ण गावाला सौरदिवे दिल्याचे गणेश खांडगे यांनी सांगितले. 

Web Title: pune news maval adivasi pada gets lights