वैद्यकीय मदतीसाठी पुणेकरांची सेवेला साद

योगिराज प्रभुणे
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे - नुकताच पाऊस पडून गेला होता... अवघ्या वीस-एकवीस वर्षांची मुलगी नगर रस्त्यावरून दुचाकीने घरी जात होती... काही समजायच्या आतच मागचे चाक रस्त्यावरून घसरले. तिचे डोके बाजूच्या दगडावर आपटले आणि ती क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडली... तेथील एका नागरिकाने "108'वर दूरध्वनी केला. दहाच मिनिटांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका आली. मुलीला स्ट्रेचरवर ठेवले आणि त्या क्षणापासून तिच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णवाहिकेत तिच्यावर प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुणे - नुकताच पाऊस पडून गेला होता... अवघ्या वीस-एकवीस वर्षांची मुलगी नगर रस्त्यावरून दुचाकीने घरी जात होती... काही समजायच्या आतच मागचे चाक रस्त्यावरून घसरले. तिचे डोके बाजूच्या दगडावर आपटले आणि ती क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात पडली... तेथील एका नागरिकाने "108'वर दूरध्वनी केला. दहाच मिनिटांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका आली. मुलीला स्ट्रेचरवर ठेवले आणि त्या क्षणापासून तिच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णवाहिकेत तिच्यावर प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघात झाल्यापासून अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तिच्या उपचारांची दिशा निश्‍चित झाली होती. त्यानुसार मेंदू विकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ अशा डॉक्‍टरांच्या पथकाने उपचार सुरू केल्याने त्या मुलीचे प्राण वाचले. 

अशा प्रकारे कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी (ईएमएस) पुणेकर "108'वर संपर्क साधतात. राज्यात सर्वाधिक वैद्यकीय मदत मागणारे दूरध्वनी पुण्यातून आले असून, गेल्या साडेतीन वर्षांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील एक लाख 44 हजार रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे. 

तातडीची वैद्यकीय मदत आवश्‍यक असणाऱ्या राज्यातील प्रत्येक रुग्णाला मिळावी, यासाठी "ईएमएस' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. राज्यात "भारत विकास ग्रुप'तर्फे (बीव्हीजी) ही सेवा राज्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संस्था खासगी असून या सुविधेसाठी राज्य सरकारकडून निधी दिला जातो. नैसर्गिक आपत्ती असो, की कोणत्याही प्रकारचा अपघात पुणेकरांचा पहिला "कॉल' 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेला जातो, हे राज्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

"ईएमएस'ने राज्यात वैद्यकीय सेवेचे जाळे उभे केले आहे. यामध्ये प्राथमिक उपचार करून रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची सुविधा दिली जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यातील 16 लाख 58 हजार 469 रुग्णांना वैद्यकीय मदत मिळाली. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे एक लाख 44 हजार 937 रुग्ण पुण्यातील होते, असा निष्कर्ष "ईएमएस'च्या "कॉल सेंटर'ला आलेल्या दूरध्वनींच्या विश्‍लेषणावरून काढण्यात आला आहे. त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यातून एक लाख सात हजार रुग्णांना ही मदत मिळाली आहे. 

अशावेळी मदत
प्रसूती  सर्व प्रकारचे अपघात
छातीत दुखणे     हृदयविकार
सर्पदंश    अर्धांगवायूचा झटका 

अशी मिळते वैद्यकीय सेवा
अपघातानंतर २० मिनिटांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका घटनास्थळी पोचेल, अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेला ‘जीपीएस’ बसविण्यात आल्याने घटनास्थळापासून जवळ असलेल्या रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दूरध्वनीवरून दिली जाते. त्यामुळे कमी वेळेत रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचते. रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर रुग्णांवर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाते. ‘गोल्डन अवर’मध्ये मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्‍यता वाढते.

पुणे शहर आणि जिल्ह्यात ९२ रुग्णवाहिकांमधून रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. दरवर्षी या सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय आपत्काळामध्ये पुणेकर तातडीने १०८ हा ‘इएमएस’ क्रमांक डायल करतात.
- डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके, सीओओ, बीव्हीजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प 

Web Title: pune news Medical help