मेडिकल आहेच; पॅरामेडिकलही उत्तम

मेडिकल आहेच; पॅरामेडिकलही उत्तम

आयुष्यमान वाढत चाललंय तसे आरोग्याचे प्रश्‍न मोठे होत चाललेत. आजारांबरोबर डॉक्‍टरांचेही स्पेशलायझेशन झाले आहे. वेगवेगळ्या थेरपी निर्माण झाल्या आहेत. मेडिकलमध्ये ॲलोपॅथी, डेंटेस्ट्री, आयुर्वेदिक व होमिओपॅथी या चार प्रमुख पारंपरिक शाखा आहेत; परंतु या व्यतिरिक्त स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी देणारे काही पर्याय आहेत. त्याचे प्रवेश केवळ सीईटीच्या नव्हे; तर ‘नीट’च्याच गुणांवरच होतील. 

पॅरामेडिकल 
अर्धवैद्यकशास्त्र हा शासकीय आणि खात्रीशीर आर्थिक आधार मिळवून देणारा अभ्यासक्रम आहे. वैद्यक क्षेत्राचा तो कणा आहे. डॉक्‍टर आणि रुग्ण यांना आधारभूत ठरणारे मनुष्यबळ याद्वारे निर्माण होते. त्यामुळे एनईईटीमध्ये कमी गुण मिळाले, तरी विद्यार्थ्यांनी आरोग्य विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी करावी. त्याच गुणवत्ता क्रमांकावर पॅरामेडिकलचे प्रवेश होतात. 

लॅबोरेटरी, रेडिओग्राफिक, रेडिओथेरपी, कार्डिओलॉजी, न्यूरॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्युजन, ऑप्टोमेस्ट्री, प्लॅस्टर, ॲनास्थेशिया, ऑपरेशन थिएटर, ट्रान्सफ्युजन मेडिसीन, क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट, एन्डोस्कोपी टेक्‍निशियन, फॉरेन्सिस सायन्स आदी अठरा प्रकारचे तंत्रज्ञ अभ्यासक्रम. कालावधी तीन वर्षांचा. वैद्यकीय व्यवसाय, उद्योग क्षेत्रात उत्तम संधी. पुण्यात अभ्यासक्रम उपलब्ध. 

फिजिओथेरपी 
प्रौढ व लहान मुलांमधील मेंदू, हाडांचे आजार, प्रसूतिपूर्व, प्रसूतिपश्‍चात, क्रीडावैद्यक अशा सर्वच रुग्णोपचारांमध्ये फिजिओथेरपीची मदत घ्यावी लागते. बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देशात; तसेच परदेशांत नोकरीच्या चांगल्या संधी. 

ऑक्‍युपेशनल थेरपी 
शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पुन्हा उभारी देण्यासाठी ही उपचारपद्धती महत्त्वाची ठरते. स्वरयंत्रातील दोषांमुळे स्पीच थेरपी वापरली जाते. अभ्यासक्रम चार वर्षांचा. पुण्यात उपलब्ध. 

नर्सिंग 
वैद्यकीय व्यवसायात डॉक्‍टर एवढाच महत्त्वाचा घटक म्हणजे परिचारिका. यामध्ये बारावीनंतर चार वर्षांचा बीएस्सी आणि साडेतीन वर्षांचा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी हा अभ्यासक्रम. भारत आणि परदेशांतही परिचारिकांना वाढती मागणी असल्याने नोकरीची मुबलक संधी उपलब्ध. अभ्यासक्रम पुण्यात उपलब्ध.

पशुवैद्यक अभ्यासक्रम (बीव्हीएस्सी) 
पशुवैद्यकशास्त्र हे पारंपरिकदृष्ट्या कृषी क्षेत्राशी निगडित आहे. कालावधी पाच वर्षे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, जनावरांवरील औषधोपचार, संकरित जातीच्या जनावरांची पैदास, त्यांच्यावरील उपचार, औषध कंपन्यांचा संशोधन विभाग, पशुखाद्य कारखाने या क्षेत्रात मोठ्या संधी. स्वयंरोजगारासाठी फायदेशीर. महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठ नागपूर संलग्न नागपूर, मुंबई, शिरवळ (सातारा), परभणी व उदगीर या पाच सरकारी महाविद्यालयांमार्फत प्रवेशप्रक्रिया.

प्रवेशप्रक्रिया 
पशुवैद्यक अभ्यासक्रमाची वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेशी निगडित नसते. मुंबई, पुणे (शिरवळ), उदगीर, परभणी व नागपूर या पाच शासकीय महाविद्यालयांत एकत्र प्रवेशप्रक्रिया.

पॉलिमर, इंडस्ट्रियल केमिस्ट्री ठरतेय उद्योजकांसाठी उपयुक्त 
जळगाव : जिल्ह्यात प्रामुख्याने कृषीवर आधारित, तसेच प्लॅस्टिक उद्योग विकसित झाले आहेत. पीव्हीसी पाइप, ठिबक, सूक्ष्म सिंचन आदी उद्योगांसाठी लागणाऱ्या कौशल्याची गरज काही अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भागवली जाते. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑरगॅनिक केमिस्ट्रीसह, पॉलिमर, फिजिकल, इंडस्ट्रियल केमिस्ट्रीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्सच्या माध्यमातून २० विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश विद्यार्थी एकतर कंपनीत नोकरीला लागतात, तर काहींनी स्वत:चे उद्योगही विकसित केल्याची उदाहरणे आहेत. याशिवाय योग निसर्गोपचार या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. यात प्रमाणपत्र, पदवी असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने दरवर्षी किमान शंभर विद्यार्थी याचे शिक्षण घेत आहेत.

नाट्यशास्त्र व संगीत विषयातील पदवी घेण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो, तर मुलींमध्ये फॅशन व इंटरेरिअर डिझायनिंगची क्रेझ आहे. हे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थिनी स्वत:चे लहान व्यवसाय टाकत असल्याचे दिसून येत आहे.

अकाउंटिंग, फायनान्स, शेअर मार्केट प्रमाणपत्र
नागपूर : बदलत्या काळानुसार करिअरचे नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी ‘बॅफ’ म्हणजेच अकाउंटिंग अँड फायनान्स, बॅंकिंग आणि इन्शुरन्सशी निगडित बीबीआय, तसेच बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंजतर्फे सुरू असलेल्या शेअर मार्केट प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सायकॉलॉजी, सोशिओलॉजीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याशिवाय कॉपिरायटिंग, भाषांतराचे प्रदेश खुले आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्‍टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न न पाहता बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन ऑडिओलॉजी (बोलताना होणारा त्रास), डेंटल टेक्‍निशियन, वेटरनरी सायन्सचादेखील विचार करायला हवा. याशिवाय एथिकल हॅकिंग, स्पा मॅनेजमेंट, फ्लेव्हर केमिस्ट, संग्रहालयांचे अभ्यासशास्त्र, बीएससी इन हॉस्पिटॅलिटी, फॅशन स्टायलिंग, ज्वेलरी डिझाइन तसेच मास मीडियाशी संबंधित व्हिडिओ जॉकी, रेडिओ जॉकी, एडिटिंग या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगांसाठी प्रशिक्षण
सोलापूर : लोकमंगल संस्थेतर्फे शेतीवर आधारित प्रशिक्षण देण्यात येते. उसावर प्रक्रिया करणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, खतनिर्मिती, खतविक्री, प्रक्रिया उद्योग आदींतून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. लोकमंगलतर्फे देण्यात येणारे प्रशिक्षण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येते. हैदराबाद येथील मॅनेज संस्था हे प्रशिक्षण राबवते. या संस्थेचे सोलापुरातील केंद्र म्हणून लोकमंगलची निवड केली आहे. लोकमंगलतर्फे एका वर्षात तीन वेळा (तीन बॅच) प्रशिक्षण दिले जाते. एका वर्षात ११० विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. विद्यार्थ्यांकडून फी न घेता प्रशिक्षण कालावधीत त्यांची राहण्याची व जेवण करण्याची सोय संस्थेतर्फे केली जाते.

‘स्टार्ट अप’कडील कल वाढविण्यास संस्थांचा पुढाकार
नाशिक : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) तर्फे नाशिकमध्ये देशातील ‘पहिले इनोव्हेशन सेंटर’ उभारले गेले असून, येथील संशोधकदेखील करिअरची नवी दिशा शोधण्यात यशस्वी ठरत आहेत. कुंभमेळाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या ‘कुंभथॉन’ या चळवळीतून अनेक स्टार्ट अप सुरू झाले असून, तंत्रज्ञानातील करिअरची नवीन दृष्टी नाशिकच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहे. मराठा विद्या प्रसारकसह येथील विविध शिक्षण संस्थांत नामांकित उद्योजकांना आमंत्रित करून त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणत स्टार्ट अप, उद्योग उभारणीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. इतरही संस्थांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवत स्टार्ट अप घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लघुउद्योजिका घडविणारी नापासांची शाळा
कोल्हापूर : स्वयंसिद्धा संस्थेने १९९७ ला ‘नापास मुलींची शाळा’ ही संकल्पना सुरू केली. गेली वीस वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू असून, खास दहावी नापास मुलींसाठी हा उपक्रम राबवला गेला; मात्र गेल्या तीन वर्षांपासून मुलींचे नापास होण्याचे प्रमाण कमी झाल्याने गरजू आणि कमी गुण मिळालेल्या मुलींसाठी हा उपक्रम चालवला जातो. आठवड्यातील तीन दिवस या मुलींना या शाळेत चौदा विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात संबंधित मुलींचा कल पाहून एकाच व्यवसायाचा तिला पूर्ण अभ्यासक्रम दिला जातो. प्रत्येक वर्षी तीस मुलींसाठी संस्था स्वखर्चाने हा उपक्रम राबवते. आजवर पाचशेहून अधिक मुलींना संस्थेने शिक्षण दिले आणि त्यातील साठ टक्‍क्‍यांहून अधिक मुली पुढे लघुउद्योजिका झाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com