जास्तीचे औषधे इतर रुग्णालयांना देण्याच्या हालचाली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे  - रुग्णालयांमधील औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची तातडीने माहिती घेण्याची सुरवात महापालिकांच्या आरोग्य विभागाने केली आहे. त्यातून जीवनावश्‍यक औषधे आणि प्रतिजैविकांचा खडखडाट असल्याची माहिती बहुतांश रुग्णालयांनी दिली आहे. जास्त औषधे असलेल्या रुग्णालयातील काही औषधे इतर रुग्णालयांना तातडीने देण्यासाठी आरोग्य विभागात हालचाली बुधवारी सुरू होत्या. 

महापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या औषधांचा खडखडाट झाल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या हालचाली आरोग्य विभागात सुरू झाल्या. याबाबत उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ""महापालिकेच्या 19 रुग्णालयांमधून औषध साठ्याची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यात औषधनिहाय शिल्लक साठा मागविला आहे. त्यातून कोणत्या रुग्णालयात कोणत्या औषधांचा साठा किती आहे, याची माहिती मिळेल. त्या आधारावर सर्व रुग्णालयांमध्ये जीवनावश्‍यक औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे.'' 

महापालिकेची दोन पातळ्यांवर औषध खरेदी सुरू आहे. त्यापैकी एक औषध खरेदी ही शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेतील आहे, तर दुसरी एकत्रित औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेतील औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत आज निविदेतील "ब' अर्ज उघडण्यात येणार आहे. तर, एकत्रित औषध खरेदीच्या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यासाठी आयुक्त कार्यालयात दिला आहे.'' 

इंजेक्‍शन सिरींजची खरेदी 
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात इंजेक्‍शन सिरींज नसल्याचे वृत्त दिल्यानंतर बुधवारी याची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली. 25 लाख रुपयांच्या इंजेक्‍शन सिरींजचा पुरवठा करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. या दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयांसह काही रुग्णालयांमध्ये तातडीने सिरींजचा पुरवठा केल्याची माहिती डॉ. साबणे यांनी दिली. 

Web Title: pune news medicine hospital