भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. स्थानकाचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून येत्या दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे. स्थानकाचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून येत्या दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी-स्वारगेट मार्गावरील भूमिगत मेट्रो स्थानक जेधे चौकात होणार आहे. त्यासाठी महामेट्रोने 3 हेक्‍टर जागा महापालिकेकडे मागितली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीएमपी आणि एसटी महामंडळालाही त्यात सामावून घेतले जाणार आहे. जमिनीच्या 23 ते 28 मीटर खाली महामेट्रोचे स्थानक असेल. जेधे चौकातील भूमिगत स्थानकाचा आराखडा सहा महिन्यांत तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. त्या आधारे आता अंतिम आराखडा तयार होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिली. 

भूमिगत मेट्रो स्थानकात प्रवेशासाठी किमान चार जिने पादचाऱ्यांसाठी असतील. त्यातील दोन जिने सरकते असू शकतील. तसेच एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या बस स्थानकापर्यंत येऊ शकतील का, या बाबतचाही विचार केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर न येता तेथेच बस अथवा एसटी उपलब्ध होऊ शकेल. किमान पीएमपीची बससेवा तरी तेथे उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न आहे. स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी वाहतुकीचे सर्वेक्षणही तातडीने सुरू होणार आहे. कोणत्या दिशेने किती वाहतूक येते, याचा अंदाज घेऊन काम सुरू झाल्यावर वाहतुकीचा आराखडा निश्‍चित होईल, असेही महामेट्रोच्या सूत्रांनी स्पष्ट केले. भूमिगत स्थानकाबाबत एसटी महामंडळ आणि पीएमपीशी संपर्क साधला असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

 

स्वारगेट उड्डाण पुलावरून दुतर्फा वाहतूक? 
भूमिगत स्थानकाचे काम सुरू झाल्यावर जेधे चौकातील वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊ शकते. त्यासाठी सक्षम वाहतूक आराखडा तयार करण्याबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्याअंतर्गत जेधे चौकातील उड्डाण पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करता येईल का, याचाही विचार करण्यात येत आहे. गरज पडली तर, या पर्यायाचीही अंमलबजावणी होऊ शकते, असे महामेट्रोच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news metro pune