एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी गुन्हा दाखल झालेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे एकबोटे यांना वरिष्ठ न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी दाद मागावी लागेल. 

पुणे - कोरेगाव भीमाप्रकरणी गुन्हा दाखल झालेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे एकबोटे यांना वरिष्ठ न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी दाद मागावी लागेल. 

विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्यासमोर या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी), दंगल भडकावणे, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमानुसार शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी एकबोटे यांनी अर्ज केला होता. 

ऍट्रॉसिटी कायद्यातील कलम 18 नुसार अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची तरतूद नसल्याचा युक्तिवाद सरकार पक्ष आणि फिर्यादीतर्फे केला गेला. एकबोटे यांना पोलिस संरक्षण असल्याने कायम पोलिस त्यांच्यासोबत असतात. त्यांना या गुन्ह्यात खोटे गुंतविण्यात आले, असा दावा अर्जात केला होता. त्याला फिर्यादीतर्फे ऍड. मिलिंद पवार यांनी विरोध केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, या घटनेसंदर्भात पोलिस महासंचालकांनी दिलेल्या अहवालात एकबोटे यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे. याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी मिळणे आवश्‍यक असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी मागणी पवार यांनी केली होती. 

Web Title: pune news milind ekbote koregaon bhima case