दूध, भाजी तुटवड्याचे संकट

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 जून 2017

मुंबईसह मोठ्या शहरांना शेतकरी संपाच्या झळा

मुंबईसह मोठ्या शहरांना शेतकरी संपाच्या झळा
पुणे - किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे राजधानी मुंबईसह मोठ्या शहरांची भाजीपाला व दूध कोंडी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या संपाच्या झळा शहरांना बसण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून (ता. 3) दूध व भाजीपाला टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची भीती आहे. किरकोळ विक्रेते चढ्या भावाने माल विकत असल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली आहे.

पुण्यामध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली असून, दुधाचाही तुटवडा जाणवत आहे. फळबाजारातही आवक 80 टक्के घटली आहे. कल्याण व नवी मुंबईच्या बाजारपेठेत शेतमालाची आवक कमालीची घटली असून, सरकारने गुजरात व कर्नाटकमधून मुंबईला दूधपुरवठा करण्याची तयारी केली असली, तरी दर लिटरला दहा ते बारा रुपयांची भाववाढ झाल्याने मुंबईकरांना दरवाढीचा दणका बसला आहे.

औरंगाबाद : शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोचले आहे. शहराकडे येणारा प्रमुख भाजीपाला, दूध शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चौकाचौकांत रोखून धरली आहे. अनेक गावांत भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ भाजीपाल्यात शेळ्या सोडून दिल्या, तर काहींनी भाजीवर ट्रॅक्‍टर फिरविला.

जिल्ह्यात झाल्ट्याजवळील आडगाव येथील शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी दूध रस्त्यावर सांडले होते. दुसऱ्या दिवशी मात्र, शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता घरोघरी वाटून दिले. आंदोलन सुरू असेपर्यंत दररोज गावातच दूधवाटप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संपाचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाप्रमाणेच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर दूध व भाजीपाला ओतून सरकारचा निषेध केला आहे.

सोशल मीडियावर दुधाची व भाजीपाल्याची नासाडी करू नका, असा संदेश व्हायरल झाला आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होत आमचेच नुकसान होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

नाशिक - नाशिक जिल्ह्यात संपाला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आठवडे बाजारासह कडकडीत बंद पाळून शेतकरी संपाला पाठिंबा देण्यात आला, तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंबे, टरबूज फळांचे ट्रक अडवून सर्व माल रस्त्यावर फेकण्यात आला. अनेक ठिकाणी दुधाचे टॅंकर अडवून त्यातील दूध गरजूंना वाटण्यात आले.

नागपूर - "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे', "भाजप सरकार मुर्दाबाद', "मुख्यमंत्री मुर्दाबाद'च्या घोषणा देत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच दूध व भाजीपाला फेकत सरकारचा निषेध केला. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

नगर - शेतकऱ्यांच्या संपाची धग आज दुसऱ्या दिवशीही कायम होती. अनेक ठिकाणी सकाळपासून अनेक शेतकरी शहरात जाणाऱ्या दूध, भाजीपाल्याची वाहन अडवण्यासाठी रस्त्यावर होते. पाथर्डी तालुक्‍यात एका ठिकाणी एसटी गाडीवर दगडफेक झाली. चार ठिकाणी "रास्ता रोको' आंदोलन झाले. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध व भाजीपाला रस्त्यावर ओतून दिले.

काही गावांत आजचा आठवडे बाजार भरलाच नाही. अकोल्यात कडकडीत "बंद' पाळण्यात आला. जवळे, पुणेवाडी, गारखिंडी येथे शेतकऱ्यांनी दूध ओतून दिले.

सातारा - शेतकरी संपामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांचे व्यवहार ठप्प झाले असून, काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडले. बाजार समित्यांमध्येही शुकशुकाट जाणवत होता आणि आठवडी बाजारही भरवले गेले नाहीत.

Web Title: pune news milk vegetable shortage disaster