ट्रायलनंतरही डेमू यार्डातच उभी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

पुणे-मिरज या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर डेमू सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने पाठविल्यानंतरच रेल्वे बोर्डाने डेमू गाडी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गाडी सुरू करण्यास पुन्हा परवानगीची गरज काय, विनाकारण ही गाडी थांबून आहे. त्यातून रेल्वेचा महसूल बुडत असून, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने या मार्गावर डेमू सुरू करावी.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

पुणे - डेमू गाडी उपलब्ध आहे; परंतु परवानगी नाही, असे कारण दाखवत पुणे-मिरज या मार्गावर रेल्वे प्रशासन या मार्गावर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सोडण्यात तयार नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये या मार्गावर ट्रायल झाल्यानंतर ही गाडी यार्डातच उभी असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीला परवानगी कधी मिळणार आणि ती या मार्गावर कधी धावणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

विद्युतीकरण न झालेल्या मार्गावर डेमूची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावास रेल्वे बोर्डानेही मंजुरी दिली. त्यानुसार आतापर्यंत दहा कोचच्या नऊ डेमू गाड्या जवळपास रेल्वे प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैकी पंधरा कोचच्या दोन गाड्या दुपारच्या वेळेत पुणे-दौंड या मार्गावर सोडण्यात येतात; तर पुणे-सोलापूर या मार्गावर दहा कोचच्या दोन गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे पाच डेमू गाड्यांचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी होत आहे.

मात्र उर्वरित चार डेमू गाड्या यार्डात तशाच उभ्या आहेत. वीस ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाकडून पुणे-मिरज या मार्गावर डेमू गाडीची ट्रायल घेण्यात आली होती. ती ट्रायल यशस्वी झाली. मात्र, गाडी या मार्गावर सुरू करण्याऐवजी ती मिरजला पाठविल्यानंतर तेथील यार्डात तशीच उभी आहे. काही दिवसांनी ती गाडी हलवून किर्लोस्करवाडी येथील यार्डात आणून उभी करण्यात आली. गेली अनेक दिवस ती यार्डातच उभी होती. तेथे अडचण आल्यामुळे अखेर सात ऑक्‍टोबरला ही गाडी पुण्याला पाठविण्यात आली. तेव्हापासून ते पुणे स्टेशनच्या यार्डातच उभी आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारले असता, "बोर्डाकडून परवानगी मिळाली नाही,' असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या मार्गावर ही गाडी सोडण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु यामुळे रेल्वेचा महसूलदेखील बुडत आहे.

पुणे-मिरज या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर डेमू सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने पाठविल्यानंतरच रेल्वे बोर्डाने डेमू गाडी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गाडी सुरू करण्यास पुन्हा परवानगीची गरज काय, विनाकारण ही गाडी थांबून आहे. त्यातून रेल्वेचा महसूल बुडत असून, प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने या मार्गावर डेमू सुरू करावी.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप.

Web Title: pune news: miraj demu