"आमदार ग्रामदत्तक'साठी हवा स्वतंत्र निधी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - केंद्र सरकारच्या "खासदार आदर्श ग्राम'योजनेच्या धर्तीवर 2015 पासून राज्यांमध्ये "आमदार ग्रामदत्तक' योजना सुरू झाली. मात्र, पहिल्या टप्प्यातील गावांसाठी आराखड्यामध्ये सुचविलेल्या कामांसाठी निधीच मिळत नसल्याने कामे पूर्ण झालेली नाहीत. आमदार निधी अपुरा पडत असल्याने पुणे जिल्ह्यात 27 पैकी 19 आमदारांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात गावेच घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - केंद्र सरकारच्या "खासदार आदर्श ग्राम'योजनेच्या धर्तीवर 2015 पासून राज्यांमध्ये "आमदार ग्रामदत्तक' योजना सुरू झाली. मात्र, पहिल्या टप्प्यातील गावांसाठी आराखड्यामध्ये सुचविलेल्या कामांसाठी निधीच मिळत नसल्याने कामे पूर्ण झालेली नाहीत. आमदार निधी अपुरा पडत असल्याने पुणे जिल्ह्यात 27 पैकी 19 आमदारांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात गावेच घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

विकासकामांसाठी आमदार निधी अपुरा पडत असल्यामुळे राज्य सरकारने ग्रामदत्तक योजनेसाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावे घेण्यास आमदार इच्छुक नसल्याने ही योजना कागदावरच राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

"खासदारांप्रमाणे आमदारांनीदेखील गावे दत्तक घेऊन विकासकामे करावीत' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्यातील सर्व आमदारांनी पहिल्या टप्प्यामध्ये गावे दत्तक घेतली. परंतु, ही गावे निवडताना मतदारसंघाच्या बाहेरील असावीत, असा आदेश राज्य सरकारने काढला होता. 

आमदार म्हणतात... 
प्रा. मेधा कुलकर्णी (कोथरूड मतदारसंघ)
- प्रत्येक वर्षाला 2 कोटी, असे पाच वर्षांसाठी 10 कोटींचा निधी विधानसभेच्या आमदारांना मिळतो. महापालिका क्षेत्रात विकासकामे करताना हाच निधी अपुरा पडत असल्यामुळे दत्तक गावांच्या कामांसाठी निधी पुरत नाही. या योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला जावा, अशी राज्य सरकारला विनंती आहे. 

 राहुल कुल (दौंड मतदारसंघ) - जिल्ह्यातील गावांच्या विकासकामांसाठी आमदार निधी पुरत नाही. त्यामुळे आमदार आदर्श ग्रामदत्तक योजनेसाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी द्यावा ही पहिल्या टप्प्यापासून मी मागणी केलेली आहे. तरच ही योजना यशस्वी होईल. 

अनंत गाडगीळ (विधान परिषद) - आमदार आदर्श ग्रामदत्तक योजनेची घोषणा झाली, त्याचवेळी मी आग्रही मागणी केली होती की, "जी गावे आमदार दत्तक घेतील त्याचा विकास आराखडा तयार करून त्यावर खर्च करण्याचे सर्वाधिकार आमदारांना द्यावा.' याबाबत राज्य सरकारने भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. 

जयदेव गायकवाड (विधान परिषद) - जुन्नरमधील डोंगरकड्यामध्ये वसलेले घाटघर हे गाव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा आराखडा मंजूर करून कामे सुचविली, पण राज्य सरकारने निधी देण्यास नकार दिला. आदिवासी विभागाकडून या गावासाठी निधी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य सरकारने ग्राम दत्तक योजनेसाठी स्वतंत्र निधी द्यावा. 

- पहिल्या टप्प्यात गावांमधील कामे मंजूर पण निधीच नाही 
- दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावे घेण्यास आमदार अनुत्सुक 
- जिल्हा नियोजन समिती, खासदार निधी आणि आमदार निधीतून कामांवर खर्च 

आमदारांचे नाव पहिल्या टप्प्यात निवडलेले गाव मंजूर आराखड्यातील कामांची संख्या मंजूर कामांची रक्कम 
गिरीश बापट पेठ पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे 95 17 कोटी 43 लाख 70 हजार 
दिलीप वळसे पाटील अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे 70 15 कोटी 28 लाख 20 हजार 
महेश लांडगे कुसूर, ता. जुन्नर, जि. पुणे 43 64 कोटी 61 लाख 84 हजार 
शरद सोनावणे काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे 18 33 कोटी 32 लाख 07 हजार 
जयदेव गायकवाड घाटघर, ता. जुन्नर, जि. पुणे 76 37 कोटी 17 लाख 50 हजार 
सुरेश गोरे धामणे, ता. खेड, जि. पुणे 76 3 कोटी 54 लाख 48 हजार 
गौतम चाबुकस्वार साकुर्डी, ता. खेड, जि. पुणे 94 6 कोटी 02 लाख 17 हजार 
मंगेश कुडाळकर वांद्रे, ता. खेड, जि. पुणे 57 5 कोटी 89 लाख 80 हजार 
प्रकाश फातर्फेकर तळवडे, ता. खेड, जि. पुणे 76 3 कोटी 39 लाख 53 हजार 
लक्ष्मण जगताप सुदवडी, ता. मावळ, जि. पुणे 75 3 कोटी 59 लाख 30 हजार 
बाळा भेगडे येळसे, ता. मावळ, जि. पुणे 78 7 कोटी 08 लाख 36 हजार 
विजय काळे खारावडे, ता. मावळ, जि. पुणे 51 4 कोटी 33 लाख 77 हजार 
मेधा कुलकर्णी नेरे, ता. मुळशी, जि. पुणे 93 7 कोटी 89 लाख 55 हजार 
जगदीश मुळीक मांजरी खुर्द, ता. हवेली, जि. पुणे 107 5 कोटी 86 लाख 79 हजार 
भीमराव तापकीर कल्याण, ता. हवेली, जि. पुणे 74 5 कोटी 30 लाख 64 हजार 
बाबूराव पाचर्णे वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे 69 9 कोटी 67 लाख 90 हजार 
संग्राम थोपटे भोंगवली, ता. भोर, जि. पुणे 24 3 कोटी 68 लाख 
नीलम गोऱ्हे साळवडे, ता. भोर, जि. पुणे 38 2 कोटी 62 लाख 35 हजार 
विजय शिवतारे सोनारी, ता. पुरंदर, जि. पुणे 90 8 कोटी 67 लाख 

Web Title: pune news MLA Gramdtak scheme fund