'राज्याच्या कल्याणकारी योजना कॅंटोन्मेंट बोर्डांना लागू होणार '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - राज्यातील सर्व कॅंटोन्मेंट बोर्डांना राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन कॅंटोन्मेंटवासीयांना त्याचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती आमदार विजय काळे यांनी दिली. कल्याणकारी योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यातील पावणेतीन लाख कॅंटोन्मेंटवासीयांना फायदा होण्याची शक्‍यता आहे. 

कॅंटोन्मेंट बोर्ड ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना व अनुदान कॅंटोन्मेंट बोर्डांना देण्याबाबतचे पत्र संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकारला पाठविले होते. याची दखल घेऊन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मार्च 2016 मध्ये भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीस यांनी कॅंटोन्मेंटला योजनांचे लाभ देण्याबाबत आदेश दिला. त्यास दीड वर्ष उलटल्यानंतरही आदेशाची पूर्तता झाली नाही. 

याबाबत काळे म्हणाले, ""महापालिकेच्या धर्तीवर कॅंटोन्मेंटला कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत, ही आमची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आगामी तीन महिन्यांत या योजनांचा लाभ कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना घेता येणार आहे.'' 

प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर महिला व बालकल्याण, संजय गांधी निराधार योजना, महिला बचत गटांना अनुदान, आरोग्य, शिक्षण व रोजगार यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. 

Web Title: pune news mla vijay kale