मनसेच्या 13 कार्यकर्त्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांना हुसकावून लावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह 13 कार्यकर्त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, यापैकी पाच कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्‍कन पोलिस ठाण्यातही मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपाठोपाठ पुण्यात गुरुवारी दुपारी परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलकांनी शिवाजीनगर, सिंहगड रस्ता परिसरात राजाराम पूल आणि डेक्‍कन परिसरातील झेड ब्रिजलगत असलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांचा व्यवसाय उधळून लावला.

दुचाकीवरून आलेल्या मनसेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी राजाराम पुलाजवळ घोषणाबाजी करून परप्रांतीय फेरीवाल्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच, गाड्यांवरील फळे रस्त्यावर फेकून 26 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले, अशी तक्रार सिंहगड रस्ता येथील गुलाबहरन बागवान यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात सुमारे 50 कार्यकर्त्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष अजय बबन शिंदे तसेच पदाधिकारी राम बबन बोरकर, सचिन गुलाबराव पांगारे, अभिषेक ज्ञानेश्‍वर थिटे, प्रवीण माणिक क्षीरसागर, सुनील एकनाथ कदम, गणेश संजय पाटील, बाळासाहेब श्‍यामराव शिंगाडे, कृष्णा रामदास मोहिते, लक्ष्मण नामदेव काते, सलीम नजीर सय्यद, नरेंद्र चंद्रकांत तांबोळी आणि आशिष शरद देवधर अशी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

तसेच, मनसेच्या कार्यकर्त्यांनी डेक्‍कन परिसरात झेड ब्रिजजवळ पाणीपुरीच्या हातगाडीवरील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी संदीप वाघचौरे (वय 32, रा. पुलाची वाडी, डेक्‍कन) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून डेक्‍कन पोलिस ठाण्यात 15 ते 20 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डेक्‍कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी दिली.

जमावाने मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याची तक्रार काही पथारी व्यावसायिकांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात 13 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ दोन

Web Title: pune news mns 13 activists arrested