आरोग्यसेवा सर्वसुलभ व्हावी : भागवत 

आरोग्यसेवा सर्वसुलभ व्हावी : भागवत 

पुणे -  ""फक्त उपचारांचा विचार न करता त्याबरोबरच निरोगीपणाचाही विचार केला पाहिजे. आधुनिक उपचार पद्धती दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत असल्याची मोठी समस्या आहे. ही समस्या सुटून आरोग्यसेवा सर्वसुलभ होण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे,'' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे सांगितले. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील "पुसाळकर अणुवैद्यक आणि क्ष किरण केंद्रा'चे उद्‌घाटन भागवत यांच्या हस्ते झाले. रुग्णालयाचे कार्यकारी विश्‍वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर, विजय पुसाळकर आणि तनुजा पुसाळकर आदी उपस्थित होते. 

भागवत म्हणाले, ""शिक्षण आणि आरोग्याला देशात सर्वांत जास्त महत्त्व दिले जाते. या दोन निकडीच्या गोष्टींचा विचार सामान्य माणूस करतो. शिक्षण आणि आरोग्याची सर्वांनाच गरज असते. सर्वांना आवश्‍यक गोष्ट सर्वसुलभ असल्या पाहिजेत; पण ती त्याच्या आर्थिक मूल्यामुळे दुर्लभ होत चालली आहे, ही समस्या सर्वत्रच आहे. ती सुटण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे. आपण फक्त चिकित्सेचा विचार करतो; परंतु नुसता चिकित्सेचा विचार न करता मनुष्य आजारी पडणारच नाही, याचा विचार केला पाहिजे.'' 

""ताणतणाव हे रोगाचे मूळ कारण आहे. सुविधा वाढल्याने आराम मिळतो. अन्न दूषित झाले. परिश्रम होत नाहीत; पण मानसिक ताणतणाव खूप वाढतो. आजच्या युगात अनिवार्य आहे ते होणार; पण जे टाळू शकतो ते आपण टाळतो का,'' असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

ते म्हणाले, ""पुरेसा व्यायाम होत नाही आणि मानसिक ताणतणावही येतो, अशा वेळी आहार कसा असावा? काय लहानसहान गोष्टींची काळजी केली म्हणजे रोगाची प्रतिकारशक्ती शरीरात कायम राहते. त्यातून आजारी पडण्याचा प्रसंग येत नाही. या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. उपचाराचा विचार करताना काही गोष्टींमध्ये खर्चही करावा लागेल. तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल; पण लहानसहान गोष्टींमध्ये आरोग्याबाबत मनुष्य स्वयंपूर्ण होऊ शकतो.'' 

""चिकित्सा क्षेत्रातही तटबंध निर्माण झाले आहेत. आयुर्वेदिक, ऍलोपॅथी, होमिओपॅथीमधून काहीतरी घेण्यासारखे आहे. एक समन्वित चिकित्सेचा असा प्रकार, की जो कमी खर्चात सर्वसुलभ होऊ शकतो आणि समाजामध्ये अशा लहानसहान आजारांसाठी रुग्णालयात धाव घेण्याची जरूर पडू नये, असा समाज प्रबोधनाचा विचार करावा लागेल. खेड्यांपर्यंत अशा सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे,'' असेही भागवत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com