मॉन्सूनचा पुढचा प्रवास दोन दिवसांनंतर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) राज्यातील मुक्काम कायम असून, दोन दिवसांनंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केली. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली असली, तरीही बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढल्याचे निरीक्षणही हवामान खात्याने नोंदविले आहे. 

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) राज्यातील मुक्काम कायम असून, दोन दिवसांनंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होण्याची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केली. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली असली, तरीही बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढल्याचे निरीक्षणही हवामान खात्याने नोंदविले आहे. 

राज्यात 8 जूनला मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर त्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग व्यापला. वलसाड, नाशिक विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ या भागापर्यंतचा प्रवास त्याने 18 जूनपर्यंत पूर्ण केला; मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्याने राज्याच्या याच भागात विश्रांती घेतली आहे. मॉन्सूनच्या वाऱ्याचा जोरही ओसरला आहे. त्यामुळे मॉन्सून दाखल होऊनही राज्यातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली उतरला होता; मात्र पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आता निर्माण झालेले नाही. अरबी समुद्रामध्ये मोसमी वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. पुढील 38 तासांमध्ये यात फारशी प्रगती होणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे. या परिस्थितीत पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बदल होण्यास सुरवात होईल, असा अंदाजही खात्याने व्यक्त केला आहे. 

पुण्यात तापमान वाढले 

शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता; मात्र ढगाळ वातावरण कमी झाल्याने उन्हाचा चटका पुन्हा जाणवू लागला आहे. शहरात कमाल तापमान 1.1 अंश सेल्सिअसने वाढून 31.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

Web Title: pune news monsoon weather