डासप्रतिबंधक औषध खरेदीचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मार्चअखेर असली तरी अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार औषधखरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये औषधांचा पुरवठा केला जाईल.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका.

पुणे - शहर व उपनगरांतील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीसाठी डासप्रतिबंधक औषधांचा साठा अत्यावश्‍यक असतो; परंतु क्षेत्रीय कार्यालयांमधील हा साठा संपल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तातडीने औषध खरेदीचा आदेश दिला आहे.

शहरातील नदी, ओढे, नाले आणि उघड्या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात डास व चिलटांची वाढ झाली आहे. सध्या उष्ण वातावरण, सांडपाण्याच्या ठिकाणी डास उत्पत्तीला पोषक वातावरण असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरात डेंगी, चिकुनगुनियाच्या संशयित रुग्णांसह कारण न समजू शकलेल्या तापाचे रुग्णदेखील वाढले आहेत. त्यामुळे उपनगरांसह समाविष्ट गावांमध्येदेखील औषधफवारणी करण्यात आली. परिणामी हा साठा संपला. अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार औषध खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू होती; परंतु चालू आर्थिक वर्षात ही खरेदी केली जाऊ शकत नसल्याने ती रखडण्याची शक्‍यता होती. ‘सकाळ’ने वृत्त दिल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिल्याचे स्पष्ट केले.

Web Title: pune news Mosquito Prevention drug purchasing