इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

बालरोगतज्ज्ञांचे मत; सोप्या पर्यायी पद्धतींचा वापर शक्‍य

बालरोगतज्ज्ञांचे मत; सोप्या पर्यायी पद्धतींचा वापर शक्‍य
पुणे - 'इन्क्‍युबेटरचा सरसकट वापर करू नये. प्रत्येक रुग्णनिहाय विचार करून त्याच्या माध्यमातून उपचार करणे, ही काळाची गरज आहे,'' असा सल्ला बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी गुरुवारी दिला आहे. 'नवजात बालकांचे प्राण वाचविण्यासाठी भारतासारख्या देशात "कांगारू मदर केअर' यासारख्या सोप्या उपचारपद्धतींचा प्रभावी वापर आवश्‍यक आहे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील इन्क्‍युबेटरमध्ये एकापेक्षा जास्त बालकांवर उपचार करावे लागत असल्याची घटना पुढे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. जोग यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला, त्या वेळी त्यांनी हा सल्ला दिला.

डॉ. जोग म्हणाले, 'गर्भावस्थेतील रक्तक्षय, जन्मतः कमी वजन असलेले नवजात बालक आणि कुपोषित बालक यांना इन्क्‍युबेटर लागण्याची शक्‍यता असते; पण या व्यतिरिक्तही काही कारणांमुळे नवजात बालकाला इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्याची गरज लागते. यापैकी नेमक्‍या कोणत्या कारणासाठी नवजात बालकाला इन्क्‍युबेटरमध्ये ठेवावे लागत आहे, याबाबत डॉक्‍टरांनी स्पष्ट असावे.''

इन्क्‍युबेटरला आता "वॉर्मर' असे म्हटले जाते, त्यातून नवजात बाळाला उष्णता मिळते, असेही त्यांनी सांगितले.

कधी लागतो इन्क्‍युबेटर?
- कमी किंवा अपुऱ्या दिवसांमध्ये प्रसूती झाल्याने जन्मलेले बाळ (37 आठवड्यांपूर्वी)
- नवजात बाळाचे जन्मतः कमी असलेले वजन (दोन किलोपेक्षा कमी)
- वेगवेगळ्या कारणांनी वाढलेली नवजात बालकाच्या आरोग्याची जोखीम
- बाहेरील वातावरणानुसार बाळाला शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नसल्यास
- रक्तातील साखरेच्या प्रमाणावर सातत्याने देखरेख करण्यासाठी

इन्क्‍युबेटरला पर्याय "कांगारू मदर केअर'
भारतासारख्या देशात प्रत्येक नवजात बालकाला इन्क्‍युबेटरची गरज लागतेच असे नाही. अर्थात, प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत हा निर्णय वेगळा असतो. काही नवजात बालकांना आणि आईला एकाच दुपट्यात लपेटून ठेवले जाते, त्याला "कांगारू मदर केअर' म्हणतात. त्यात बाळाच्या त्वचेचा संपर्क हा आईच्या त्वचेशी होतो. कोलंबियासारख्या देशांमध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. कमी वजनाच्या म्हणजे 1300 ग्रॅम वजनाच्या आतील बालकांसाठी, तसेच स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित न करणाऱ्या बालकांसाठी हा पर्याय भारतासारख्या देशात प्रभावी ठरेल, असा विश्‍वास डॉ. जोग यांनी व्यक्त केला.

कधी वापरता येईल "कांगारू मदर केअर'चा पर्याय
- जन्मानंतर पाच ते सहा दिवसांमध्ये आई आणि नवजात मूल यांना एकत्र ठेवता येईल
- अपुरे दिवस आणि कमी वजन असलेल्या नवजात बालकांसाठी हा पर्याय वापरता येईल

पुण्यातील स्थिती
पुण्यातील जिल्हा रुग्णालयात 12 इन्क्‍युबेटर आहेत. ते सर्व सुरू असून, एका इन्क्‍युबेटरवर एकाच नवजात बालकाला ठेवले जाते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी दिली.

Web Title: pune news The most common use of the incubator is unnecessary