टेकड्यांची लचकेतोड

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 23 मार्च 2018

दोन वर्षांत केवळ तिघांवर गुन्हा
पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये टेकडीफोड सुरू असताना संबंधितांवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. बेकायदा टेकडीफोड होत असल्याच्या २६ तक्रारी आल्यावर महापालिकेने केवळ तिघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही अद्याप एकालाही अटक केलेली नाही. महापालिका आणि पोलिसांचे अभय मिळत असल्यानेच टेकड्यांचे लचके तोडण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. 

दोन वर्षांत केवळ तिघांवर गुन्हा
पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये टेकडीफोड सुरू असताना संबंधितांवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. बेकायदा टेकडीफोड होत असल्याच्या २६ तक्रारी आल्यावर महापालिकेने केवळ तिघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही अद्याप एकालाही अटक केलेली नाही. महापालिका आणि पोलिसांचे अभय मिळत असल्यानेच टेकड्यांचे लचके तोडण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. 

कोथरूड, बाणेर, बावधन, वारजे, कात्रज, कोंढवा, येवलेवाडीचा धनकवडी, आंबेगाव, धायरी, पर्वती आदी भागांत टेकड्यांच्या परिसरात लोकवस्ती आहे. गेल्या काही वर्षांत टेकड्या फोडून घरे उभारण्यात येत आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने काही ठिकाणी संपूर्ण टेकडी ताब्यात घेऊन उद्योगांसाठी वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बावधन, धायरी आणि पर्वती येथील टेकडीफोड याच कारणासाठी सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमींनी केलेल्या पाहणीतून दिसून आले. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पाहणी करून टेकडीफोड थांबविल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधितांवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचेही सांगण्यात आले. पण पोलिसांनी याची गांभीर्याने दखल न घेतल्याने गुन्ह्यानंतर पुढे काहीच झाले नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘बीडीपी’तही बेकायदा बांधकामे
शहरातील डोंगरमाथा आणि डोंगरउताराच्या भागात बांधकामे करण्यास बंदी आहे. तसेच जैवविविधता प्रकल्पातही (बीडीपी) बांधकामे करता येत नाहीत. मात्र डोंगरमाथा आणि उतार असलेल्या परिसरात काही ठिकाणे बेकायदा बांधकामे होत असल्याचे दिसून आले आहे. अशा ठिकाणी बांधकामे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. पण महापालिका प्रशासन तशी पावले उचलत नसल्याने अशा घटना वाढत आहेत. 

टेकड्या आणि उताराचा भाग फोडण्याच्या घटनांची तातडीने दखल घेतली जाते. तक्रारीनंतर लागेचच प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केले जाते. संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन तेथील साहित्य ताब्यात घेतले जाते. बावधन येथील सर्वे क्रमांक ६० मधील प्रकरणात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांकडून त्याला अटक झालेली नाही.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका 

धायरीत मोठ्या प्रमाणात टेकडीफोड होत असल्याचे आढळून आले असून, त्याची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. सर्वच तक्रारीनुसार पाहणी केले जाते. दक्षिण पुण्यातील विविध भागांतून १२ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी धायरी आणि कोंढवा येथील प्रकार गंभीर आहेत.
- नामदेव गंभिरे, कार्यकारी अभियंता, महापालिका 

Web Title: pune news mountain digging crime