अवयवदानातून उजळेल अनेकांच्या जीवनात आनंदाची पणती - रावत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

पुणे - 'व्यक्‍तिगत आयुष्यात अनेकजण देहदान, अवयवदान करून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक प्रकाश देतात. वस्तुतः ही एक चळवळ होऊन ती समाजानेच दृढ करावी, जेणेकरून अनेकांच्या जीवनात आनंदाची पणती उजळेल.'' अशी अपेक्षा माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केली.

पुणे - 'व्यक्‍तिगत आयुष्यात अनेकजण देहदान, अवयवदान करून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक प्रकाश देतात. वस्तुतः ही एक चळवळ होऊन ती समाजानेच दृढ करावी, जेणेकरून अनेकांच्या जीवनात आनंदाची पणती उजळेल.'' अशी अपेक्षा माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केली.

वैकुंठ परिवार, यमगरवाडी मित्र मंडळ, सह्याद्री कुणबी संघातर्फे "एक पणती पूर्वजांसाठी' या संकल्पनेनुसार आयोजित दीपोत्सव प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, मिलिंद एकबोटे, सुरेश नाशिककर, सुरेंद्र मोघे गुरुजी, दीपाली मोरे उपस्थित होते. या उपक्रमात गेली 18 वर्षे सहभागी असलेले राजू ऊर्फ विजय गिजरे, रवी ननावरे, प्रसाद करशेट्टी यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. नरवीर तानाजी मालुसरे गोशाळेला वैकुंठ परिवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, सेवाभावी नागरिकांनी गोशाळेला धान्यदान दिले. काका महाराज सेवा परिवाराचे सदस्यही या उपक्रमात सहभागी झाले होते.

नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे दीपोत्सवादरम्यान नागरिकांनी दहा हजार पणत्या तेवून पूर्वजांप्रती आदरांजली अर्पण केली.

रावत म्हणाले, 'एक पणती पूर्वजांसाठी हा उपक्रम मनुष्याचे भावविश्‍व समृद्ध करणारा आहे. सुरेंद्र मोघे गुरुजींनी ही संकल्पना समाजात रुजवली. प्रकाश हा मनुष्याच्या जीवनाचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे हजारो दिवे तेववून समाज कृतज्ञतेने पुढे येत आहे. त्याप्रमाणेच अवयवदान, देहदानातून मिळणारा आनंदही एखाद्या व्यक्तीला जीवनदान देणारा आहे.''

मोघे म्हणाले, 'पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम सुरू केला. सुरवातीला गोडेतेलाच्या पन्नास पणत्या तेवविल्या होत्या. आता दहा हजारांहून अधिक पणत्या तेववून नागरिक या दीपोत्सवात सहभागी होतात.''

Web Title: pune news mp pradip ravat talking