‘महावितरण’च्या अधिकाऱ्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

कात्रज- थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला निवृत्त पोलिस अधिकारी आणि त्यांच्या दोन मुलांनी जबर मारहाण केली. ही घटना आंबेगाव पठार येथे गुरुवारी दुपारी घडली. 

कात्रज- थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला निवृत्त पोलिस अधिकारी आणि त्यांच्या दोन मुलांनी जबर मारहाण केली. ही घटना आंबेगाव पठार येथे गुरुवारी दुपारी घडली. 

याप्रकरणी सहायक अभियंता पवन मनोहर देशपांडे (वय २६, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘महावितरण’चे धनकवडी उप-विभागीय कार्यालयातील कर्मचारी उत्तम भापकर आणि संगीता मेश्राम हे आंबेगाव पठार परिसरात थकीत वीजबिलांची वसुली करत होते. ते निवृत्त पोलिस अधिकारी जालिंदर बाबूराव साबळे यांच्या घरी गेले. त्यांनी वीजबिल भरले आहे का, अशी विचारणा केली. आपले चार महिन्यांचे वीजबिल थकीत आहे ते भरा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असे सांगितले. 

त्यावर जालिंदर साबळे यांनी बिल भरल्याचे सांगितले. पावती दाखवण्याची विनंती केली असता, त्यांनी टाळाटाळ करून वाद घालण्यास सुरवात केली. त्या दोन कर्मचाऱ्यांनी देशपांडे यांना तशी माहिती दिली. विद्युत सहायक सागर चौधरी यांच्यासोबत देशपांडे हे साबळे यांच्या घराजवळ आले. थकीत वीजबिल भरल्याची पावती दाखवा, अन्यथा कारवाई करावी लागेल असे म्हणताच, पावती नाही काय करायचे ते करा असे म्हणत साबळे यांनी शिवीगाळ करत देशपांडे यांना मारहाण केली. त्यानंतर साबळे यांचा मुलगा राकेश आणि अंकुर या दोघांनी देशपांडे यांना बांबूने मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी देशपांडे यांना बाजूला घेऊन पोलिस चौकी गाठली. देशपांडे यांच्या डोक्‍याला व हाताला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

Web Title: pune news mseb officer