ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मरमुळे दुर्घटनेची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

जनतेचे प्रश्‍न 
महावितरण हे तपासते का? 
इमारतीतील ट्रान्स्फॉर्मरची जागा योग्य आहे का? 
बिल्डरने ट्रान्स्फॉर्मरची निवडलेली जागा सुरक्षित आहे का? 
ट्रान्स्फॉर्मरसाठी नियमानुसार पुरेशी जागा सोडली आहे का? 
आर्किटेक्‍टने इमारतीचा आराखडा करतेवेळी वीजेसाठीच्या पायाभूत सुविधांचा योग्य विचार केला आहे का? 
बसविलेल्या ट्रान्स्फॉर्मरची देखभाल दुरुस्ती वेळेत होते आहे का? 

पुणे - दिल्लीत ट्रान्स्फॉर्मरमधील तेलाची गळती होऊन झालेल्या स्फोटात 59 जण मरण पावल्यानंतर सरकारने तळघरांत तेलविरहित ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा अध्यादेश काढला, मात्र "हा अध्यादेश केवळ दिल्लीपुरता आहे' असे कारण देत पुण्यातील महावितरण तेल असलेल्या धोकादायक ट्रान्स्फॉर्मरकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक मोठ्या इमारती आपल्या पोटात जणू काही बॉम्बच बाळगून असल्याचे दिसून आले आहे. 

दिल्ली येथील उपहार चित्रपटगृहाच्या तळघरात बसविलेल्या ट्रान्स्फॉर्मरमधील ऑइलची गळती झाल्याने स्फोट होऊन 59 नागरिकांना प्राण गमवावे लागले. 13 जून 1997 रोजी ही घटना घडली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी केंद्र सरकारने 2003 मध्ये अध्यादेश काढला. त्यानुसार इमारतीच्या पार्किंगमध्ये अथवा सोसायटीत अथवा चित्रपटगृहांच्या इमारतीच्या परिसरात निश्‍चित केलेल्या जागेवर बसविण्यात येणारे ट्रान्स्फॉर्मर ड्राय टाइप (ऑइलविरहित) असावेत, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी नियमानुसार आणि प्रभावीपणे होताना दिसत नाही. त्यामुळे कदाचित भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. 

शहरातील बहुतांश गृहप्रकल्पांच्या पार्किंगमध्ये ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मर आहेत. त्यातील ऑइलच्या गळतीमुळे निश्‍चित केलेल्या प्रमाण पातळीपेक्षाही ऑइलचे प्रमाण कमी झाल्यास अपघाताची दाट शक्‍यता असते. ट्रान्स्फॉर्मरच्या जागेतील अर्थिंगची स्थिती तपासणे अत्यावश्‍यक आहे. अर्थिंग खराब स्थितीत असल्यास ट्रान्स्फॉर्मरची न्यूट्रल (वीजवाहिनी) तुटून एखादा अपघात अथवा ग्राहकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज व तत्सम इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे जळण्याचीदेखील दाट शक्‍यता वर्तविण्यात येते. 

शहराच्या काही भागांत इमारतीच्या बाहेर किंवा जवळपास ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मर बसविलेले आहेत. रस्त्याच्या कडेला अथवा इमारतीच्या पार्किंगमध्ये ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मरपेक्षाही ड्राय टाइप ट्रान्स्फॉर्मर बसविल्यास भविष्यातील धोका टळू शकतो. केवळ आठ दिवसांकरिता विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यापेक्षा वर्षभर सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता बाळगणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, महावितरणकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे अजूनही जुने ट्रान्स्फॉर्मर तसेच पडून आहेत. 

महावितरणने विशिष्ट कालावधीत ट्रान्स्फॉर्मरमधील ऑइल बदलले पाहिजे. नागरिकांचाही विद्युत सुरक्षा हा स्वभाव झाला पाहिजे, तरच भविष्यातील अपघात टळतील. 
- राजीव जतकर, माजी अध्यक्ष, इकॅम. 

दिल्लीसाठी अध्यादेश काढला असेल; परंतु अन्य राज्यांसाठी ड्राय टाइप ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा अध्यादेश काढलेला नाही. येथे अपघात घडला असता, तर सरकारनेच ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मर तयार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली असती. त्यामुळे ऑइल फिल्ड ट्रान्स्फॉर्मरमुळे अपघात होण्याची शक्‍यता नाही. असे ट्रान्स्फॉर्मर बदलण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. 
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल 

Web Title: pune news MSEB oil field transformation