"बालगंधर्व'चा कायापालट करू - मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव सुरू होऊनही महापालिकेने एकही उपक्रम हाती घेतला नाही, याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त करताच महापालिकेला जाग आली. "बालगंधर्व'च्या विकासकामांचे उद्‌घाटन करत या रंगमंदिराचा वर्षभरात कायापालट करू, असे महापालिकेने जाहीर केले. महापौर मुक्ता टिळक यांनीच सोमवारी ही घोषणा केली. 

बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा "बालगंधर्व' पुरस्कार रंगकर्मी मनोहर कुलकर्णी यांना टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अभिनेत्री-गायिका अस्मिता चिंचाळकर, नेपथ्यकार विठ्ठल हुलावळे, दत्तात्रेय शिंदे, पुरुषोत्तम करंडक विजेते यश रुईकर यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर "बालगंधर्व'च्या विकासकामांचे महापालिकेतर्फे उद्‌घाटन झाले. 

या प्रसंगी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, उस्ताद फय्याज हुसेन खॉं, नाट्य समीक्षक माधव वझे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे उपस्थित होते. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले; तर भिमाले यांनी आभार मानले. 

महापौर म्हणाल्या... 
- बालगंधर्व रंगमंदिराने अनेक दिग्गज कलाकारांना पाहिले, घडवले. 
- या वास्तूला मोठा इतिहास असून त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल. 
- कलाकारांच्या तालमीचा हॉल पुन्हा सुरू करू. 
- अद्ययावत वीज व ध्वनियंत्रणा बसवली जाईल. 
- नाट्यगृहाबरोबरच कलादालनातही वेगवेगळ्या सुविधा देऊ. 
- कलाकारांचा कक्ष उत्तम असावा, यासाठी प्रयत्न करू. 

मी 1950 पासून नाट्यसृष्टीत आहे. तेव्हापासून आजवर करत आलेल्या कामाची दखल घेऊन महापालिकेने एका नाट्य व्यवस्थापकाला बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार दिला, हा माझ्या आयुष्यातील मोठा सन्मान आहे. 
- मनोहर कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी 

प्रायोगिक नाटकांचा, त्यातील कलावंतांचाही महापालिकेने गौरव करावा. त्यामुळे या रंगभूमीवरील कलावंतांनाही नवे बळ मिळेल. शिवाय, नाट्यविषयक उपक्रम हातात घेताना या क्षेत्रातील कलावंतांचे मत प्रथम विचारात घ्यावे. 
- माधव वझे, नाट्यसमीक्षक 

Web Title: pune news mukta tilak balgandharva rangmandir