महापालिकेचे शंभर कोटी पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पुणे - शहरातील नाले आणि ओढ्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तब्बल शंभर कोटी खर्च करून कामे केल्याचे ढोल बडविणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ पहिल्या पावसातच उघडे पडले. सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठीच्या पावसाळी गटारांची दुरुस्ती झाली नसल्याचेही या निमित्ताने दिसून आले. पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. बहुतेक भागातील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते. 

दुसरीकडे, शहरात सर्वत्र पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक कामे केल्याचा दावा करायला महापालिका प्रशासन विसरले नाही. पावसाळी कामे केली असतील, तर ही परिस्थिती का उद्‌भवली, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नव्हते. पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती असतानाही प्रशासन डोळ्यावर कातडे का ओढत आहे, असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे. शहरातील पावसाळी कामे झाली आहेत का?,अशी विचारणा केली असता एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याला उत्तर देता आले नाही. 

पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात येणाऱ्या कामांसाठी सुमारे ९८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे, मे महिन्यात ही कामे करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, जून उजाडला तरी, बहुतेक भागातील ओढे, नाल्यांची दुरुस्ती झाली नसल्याची बाब गेल्या आठवड्यात उघडकीस आली. त्यानंतर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी पाहणी करून ओढे, नाल्यांची सफाई तातडीने करण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी ही कामे हाती घेतल्याचा तोंडदेखलेपणा केला खरा, मात्र, मुळात या कामांचा दर्जा चांगला नसल्याचे सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे दिसून आले.  

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही, या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कामे करण्यात आली आहेत. मात्र, ज्या भागात ती झालेली नाहीत, तेथील कामे नव्याने करण्यात येतील.’’

पद्मावती, मित्रमंडळ चौक येथे रस्त्यांवर तळे निर्माण झाले होते. त्यामुळे दुचाकीवरून मार्ग काढता येत नव्हता. एकेका जागेवर पाच ते दहा मिनीट अडकून थांबावे लागले.
- अतुल सूर्यवंशी, नागरिक

Web Title: pune news municipal 100 crore loss