महापालिकेच्या जागांचे वीस कोटी थकले

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे - महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांनी कवडीमोल दराने भाडेतत्त्वावर घेतलेल्या महापालिकेच्या जागांचे तब्बल वीस कोटी रुपये भाडे थकल्याचे उघडकीस आले आहे. कोट्यवधींची थकबाकी वसूल करताना राजकीय धाक-दपटशाहीचा वापर होत असल्याने महापालिकेच्या वसुली पथकांतील अधिकाऱ्यांवर हातावर हात ठेवून बसण्याची नामुष्की ओढविली आहे. दुसरीकडे, काही जणांनी तर या जागा दोघा-तिघांना परस्पर भाड्याने देऊन जादा भाडेवसुलीचा धंदा सुरू केल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या मिळकतींचे गूढ
भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागा आणि इमारती नेमक्‍या कोणत्या भागात आहेत, ती जागा किती, याची स्पष्टता अजूनही महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे नाही. त्यामुळे किरकोळ दराने भाड्याने दिलेल्या जागांची स्थिती कळू शकलेली नाही. त्यामुळेही महिन्याकाठी भाडे वसूल करण्यात अडचणी येत असल्याची महापालिकेचीच तक्रार आहे. अशा काही जागांची माहिती एकत्रित करण्याची मोहीम राबविण्याचे दोन वर्षांपूर्वी जाहीर केले; परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने महापालिकेच्या मिळकतींचे गूढ वाढले आहे. याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक खुलासाही होत नाही. 

भाडेकरूंकडील थकबाकी वसूल करण्याला महापालिकेचे प्राधान्य आहे. ज्यांच्याकडे भाडे थकले आहे, अशांना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ती वसूल होईल. तरीही थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- सतीश कुलकर्णी, प्रमुख, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग, महापालिका

जागा दुसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यात
ठराविक व्यक्ती किंवा संस्थेला एखादी जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली असतानाही संबंधित भाडेकरूने दुसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यात ती जागा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेला किरकोळ भाडे देऊन, दुसऱ्या, तिसऱ्या भाडेकरूंकडून मात्र, अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. अशा व्यवहारांची महापालिकेला कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाडे वसुलीसाठी जाणाऱ्या पथकांना जुमानत नसल्याच्या घटना घडत आहेत. कारवाईचा इशारा दिल्यानंतर मात्र, राजकीय व्यक्तींची नावे घेऊन संबंधित भाडेकरू आपली सुटका करीत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: pune news municipal land amount arrears