थकबाकी न दिल्यावरून खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - व्यवसायातील एक लाख रुपयांची थकबाकी न दिल्याच्या कारणावरून दोघांनी दूध डेअरी व्यावसायिकाच्या डोक्‍यात आणि मानेवर कोयत्याने 17 वार करून खून केला. ही घटना रविवारी नऱ्हे-कात्रज रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ रविवारी घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली. 

बाळासाहेब वामन पाटील (वय 37, रा. मानाजीनगर, नऱ्हे) असे खून झालेल्या दूध व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी अलका पाटील (वय 34) यांनी फिर्याद दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल गौतम रणदिवे (वय 21, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी) आणि सागर भारत गिरी (वय 20, रा. पुणे, मूळ रा. मोहोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. 

बाळासाहेब पाटील यांचा नऱ्हेगाव परिसरात दूध डेअरीचा व्यवसाय आहे, तर आरोपी कुणाल रणदिवे याचा दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. पाटील यांच्याकडे आरोपींकडून खरेदी केलेल्या दुग्धजन्य पदार्थांची एक लाख रुपयांची थकबाकी होती. त्यावर कुणाल हा पाटील यांच्याकडे बिलाची मागणी करीत होता; पण पाटील पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे आरोपी सागर आणि कुणाल हे रविवारी पाटील यांच्याकडे गेले. तेथून ते आंबेगाव बुद्रुक येथील कर्नल शहीद प्रकाश पाटील पेट्रोलपंपाजवळ आले. पाटील यांचा मित्र पेट्रोल भरण्यासाठी गेल्यानंतर आरोपींनी कोयत्यांनी पाटील यांच्या डोक्‍यात, मानेवर आणि उजव्या हातावर वार करून खून केला. पाटील यांच्या मित्राने हा प्रकार भारती विद्यापीठ पोलिसांना कळविला. त्यावर पोलिसांनी आरोपींना सोमवारी सायंकाळी अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. यादव तपास करीत आहेत. 

Web Title: pune news murder