बालिकेचा खून करणारा पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पुणे - सिंहगड रस्ता परिसरात अडीचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. परिमंडळ दोन आणि गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही संयुक्‍त कारवाई केली.

पुणे - सिंहगड रस्ता परिसरात अडीचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. परिमंडळ दोन आणि गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही संयुक्‍त कारवाई केली.

अजय ऊर्फ बबलू रामेश्‍वर चौरे (वय 23, रा. धायरी गाव) असे आरोपीचे नाव आहे. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर आणि प्रदीप देशपांडे यांनी याबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपीने बालिकेला घरातून उचलून काही अंतरावर नेले. तेथे लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. आरोपीला सातारा जिल्ह्यातील दहीवडीजवळच्या परतवडी गावातून सोमवारी रात्री अटक करण्यात आली.

आरोपी अजय चौरे हा पेंटर असून, तो नारायण पेठेत एका बिल्डरच्या साइटवर कामाला आहे. या दांपत्याच्या इमारतीमध्येच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मित्रांकडे त्याचे जाणे-येणे होते. तीन महिन्यांपूर्वी तो या ठिकाणी राहात होता. त्याला बोनस मिळाल्याने एका मित्रासोबत त्याने दारू प्यायली. त्यानंतर त्याने पुन्हा एकट्याने दारू प्यायली.

दारूच्या नशेत तो या दांपत्याच्या घरात घुसला. त्या वेळी घरात ती बालिका, शेजारी तिची आई, वडील आणि मामा असे चौघे जण झोपले होते. त्याने त्या बालिकेला उचलून नेले व अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने बालिकेचा मृतदेह उंच गवतामध्ये झुडपात लपवून ठेवला. त्याने बाजूच्या शेतात जाऊन अंघोळ केली. तेथून तो त्याच्या बिल्डर असलेल्या मालकाच्या शेतात दहिवडी येथे गेला. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त सुरेश भोसले आणि सहायक आयुक्‍त शिवाजी पवार यांच्या सूचनेनुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक निरीक्षक सुनील गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

असा लागला गुन्ह्याचा छडा
या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याच्या तपासासाठी पाच पथके नेमण्यात आली होती. पोलिसांनी या भागातील रहिवासी व नातेवाइकांकडे कसून चौकशी केली. या भागातील पण सध्या नसलेल्या काही नागरिकांची माहिती काढली. त्या वेळी तीन-चार जण गायब असल्याचे दिसून आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी तेथील वाइन शॉपचे शनिवारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यापैकी एका तरुणाकडे चौकशी केली. त्याने त्याचा मित्र आरोपी अजय याच्यासोबत दारू प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवली. त्याचे मोबाईल लोकेशन काढले असता तो दहिवडी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथे जाऊन त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्या वेळी तो शेतामधील मंदिरात झोपला होता. आरोपी हा मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असून अविवाहित आहे. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.

Web Title: pune news murderer arrested