मोहोळ यांच्यासह भाजपचे चार सदस्य निवृत्त

BJP
BJP

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य बुधवारी निवृत्त झाले असून, त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे चार, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनाही धक्का बसला आहे. तसेच, काँग्रेसचे अविनाश बागवे, शिवसेनेचे नाना भानगिरे यांनाही निवृत्त व्हावे लागले. या सदस्यांची मुदत येत्या एक मार्चपर्यंत राहणार असून, त्यानंतर नव्या सदस्यांची निवड होईल. 

नियमाप्रमाणे स्थायी समितीच्या १६ पैकी निम्म्या म्हणजे, आठ सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. समितीतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे चिठ्ठीद्वारे काढण्यात येतात. त्याकरिता ‘ड्रॉ’ (चिठ्ठी) पद्धतीचा वापर केला जातो. त्यानुसार सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, स्थायीचे सदस्य आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत निवृत्त सदस्यांकरिता चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात, पहिली चिठ्ठी ही शिवसेनेचे नाना भानगिरे यांच्या नावाची निघाली. त्यानंतर भाजपचे हरिदास चरवड, योगेश समेळ, अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, स्थायीचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नावांच्या चिठ्ठ्या निघाल्याने ते निवृत्त झाले. पाच सदस्यांच्या चिठ्ठ्या निघाल्यानंतर उर्वरित सदस्यांमध्ये अस्वस्थता वाढली. तेव्हा सहावी आणि सातवी चिठ्ठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे आणि प्रिया गदादे यांच्या नावांची निघाली. शेवटच्या म्हणजे, आठव्या चिठ्ठीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, काँग्रेसचे अविनाश बागवे यांच्या नावांची घोषणा झाली. त्यानंतर निवृत्त झालेल्या सदस्यांची नावे पारखी यांनी जाहीर केली.  

सुनील कांबळे यांना गेल्या वेळी शब्द दिल्याने त्यांचे नाव निश्‍चित होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे, तर रासनेही प्रबळ इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांबळे-रासने यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होणार आहे. तसेच, सदस्यपदासाठी सर्वच पक्षातील ज्येष्ठ आणि नवे सदस्य इच्छुक असून, त्यात महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ निवृत्त झाले असले तरी, पक्षाच्या पातळीवर त्यांच्या नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो, याची चर्चा आहे. गेल्या वर्षभरातील काम आणि अनुभव यामुळे त्यांची निवड होईल, असे सांगण्यात येत आहे. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

उत्सुकता, धाकधूक आणि अपेक्षा
महापालिकेच्या मुख्य इमारतीतील सभागृहात दुपारी सव्वाबाराला चिठ्ठीद्वारे सदस्यांना निवृत्त करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली. नगरसचिव सुनील पारखी यांनी या प्रक्रियेचे नियम सांगितल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला. तेव्हा उत्सुकता वाढली; पण प्रत्यक्ष चिठ्ठी काढताना, सदस्यांची धाकधूक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी पहिली चिठ्‌ठी काढली ती भानगिरे यांच्या नावाची. त्यानंतर चरवड, समेळ आणि मोहोळ, टिंगरे, यांच्या निवृत्तीची घोषणा झाली. अध्यक्ष मोहोळ बाहेर पडल्याने उपस्थितांकडून आश्‍चर्य व्यक्त झाले. त्यापाठोपाठ सहावी आणि सातवी चिठ्ठी राष्ट्रवादीच्या दोन महिला सदस्यांच्या नावांच्या निघाल्या. शेवटची चिठ्‌ठी कोणाच्या नावाची असेल?, याची चर्चा सदस्यांमध्ये रंगली. त्यावरून एकमेकांच्या नावांची चर्चाही झाली. त्यामुळे सदस्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली. तेवढ्यात बागवे यांचे नाव असलेली चिठ्‌ठी निघाल्याचे पारखी यांनी जाहीर केले. तेव्हा उपस्थितांना टाळ्या वाजविण्याचा मोह आवरला नाही. आपल्या पक्षाचे एवढे सदस्य निवृत्त झाल्याचे कळताच, त्या त्या राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या नावांची महापालिकेच्या वर्तुळात चर्चा रंगली होती.

इच्छुकांची तयारी 
स्थायी समितीच्या या सदस्यांची मुदत येत्या एक मार्चला संपल्यानंतर महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि नव्या सदस्यांची निवड होईल. त्यात, भाजपच्या चार, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेस, शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड होणार आहे. त्यासाठी आतापासून इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांनी ‘फील्डिंग’ लावली आहे. अध्यक्षपदासाठी सुनील कांबळे, हेमंत रासने यांच्यासह राजेंद्र शिळीमकर, महेश लडकत आदी नावांची चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com