लोकांच्या सेवेसाठी डॉक्‍टर व्हायचेय!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - पुण्यातील मुस्कान पठाण ही आयसीएसईच्या (इंडियन सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिने 99.40 टक्के गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. तिला भविष्यात डॉक्‍टर बनायचे आहे. लोकांची सेवा करायची आहे म्हणून डॉक्‍टर व्हायचे आहे. त्या दृष्टीने तयारीदेखील सुरू केल्याचे तिने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुणे - पुण्यातील मुस्कान पठाण ही आयसीएसईच्या (इंडियन सर्टिफिकेट फॉर सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिने 99.40 टक्के गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. तिला भविष्यात डॉक्‍टर बनायचे आहे. लोकांची सेवा करायची आहे म्हणून डॉक्‍टर व्हायचे आहे. त्या दृष्टीने तयारीदेखील सुरू केल्याचे तिने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

मुस्कान ही पुलगेट परिसरातील हचिंग्ज स्कूलमध्ये शिकत आहे. तिचे वडील अब्दुल्ला हे खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी, तर आई शाकिरा या डॉक्‍टर आहेत. तिच्या या यशाचा आनंद तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुस्कानने यशाचे श्रेय हे आई-वडील, कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. अब्दुल्ला म्हणतात, मुस्कान अभ्यास करताना तिच्या आजीनेदेखील तिची खूप काळजी घेतली. तिचादेखील यशात मोठा वाटा आहे.

देशात प्रथम क्रमांक मिळाल्याच्या यशाबद्दल खूप आनंद झाल्याचे सांगताना मुस्कान म्हणाली, ""दहावीत देशात प्रथम येईल, अशी अपेक्षा नव्हती. शाळेत नववीत प्रथम आले होते. त्यापूर्वी फारसे यश मिळाले नव्हते. नववीत प्रथम आल्यावर किमान शाळेत प्रथम यायला पाहिजे, असे वाटले; पण मेहनत घेतली आणि त्यातून खूप चांगले यश मिळाले. माझे कुटुंबीय आणि शिक्षक यांच्यामुळेच मला हे यश मिळविता आले.''

'अभ्यास करताना परीक्षेपूर्वी रोज दहा-बारा तास असे काही केले नाही. तसे करूनही काही उपयोग नाही. त्यामुळे रोज थोडा थोडा अभ्यास केला. दहावीच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाची तयारी आणि योग्य नियोजन केले होते. शाळेनेदेखील चाचण्या घेण्यावर खूप भर दिला होता. त्यामुळे परीक्षेवेळी ताण आला नाही. आता मला डॉक्‍टर व्हायचेय. आई डॉक्‍टर आहेच; पण मला लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्‍टर होण्याचे ठरविले आहे,'' असा मानस मुस्कानने व्यक्त केला.

हचिंग्ज स्कूलच्या प्राचार्या रिटा काटवटी आणि शिक्षिका स्मिता वंधारे म्हणाल्या, 'शाळेत नियमितपणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या चाचण्या घेतल्या. परीक्षेआधी रोज एक चाचणी असायची. त्यातून विद्यार्थ्यांच्या चुका दुरुस्त केल्या जात होत्या. मुलांना कोणतीही शंका वाटली तर शिक्षकांनी दूरध्वनीवरूनदेखील त्यांना मार्गदर्शन केले. मुस्कानने अभ्यासचे योग्य नियोजन आणि मेहनत केली. त्याचे हे फलित आहे.''

Web Title: pune news muskan pathan talking