पर्यायी व्यवसायात रमून नागाचा सन्मान 

प्रसाद पाठक
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.

पुणे - श्रावण शुद्ध पंचमीला नागोबाची पूजा करून, त्याला दूध प्यायला द्यायचे. नागोबाला घेऊन येणाऱ्या गारुड्यांना धान्य, कपडे किंवा काही पैसे द्यायची पूर्वीची प्रथा होती. परडीत ठेवलेल्या नागोबाचा खेळ करून मदारी समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. नागावरच पोट भरणारा हा समाज. मात्र, जिवंत नागाला पकडण्याची प्रथा बंद झाल्याने, समाजातील तरुणांपैकी कोणी रिक्षा चालवतोय. कोणी व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, जादूचे प्रयोग करून उदरनिर्वाह करतोय. मुलीही आता शिक्षणाकडे वळू लागल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इब्राहिम मदारी मेहतर यांचे आम्ही वंशज असल्याचे समाजाचे नागरिक अभिमानाने सांगतात. घोरपडी गावात त्यांची वस्ती आहे. साधारणतः दोन हजार नागरिक पुण्यात राहतात. नागपंचमीला हीच मंडळी शहरभर फिरून नागोबाचे दर्शन घडवीत असत. नागपंचमीनिमित्त लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथून किंवा रत्नागिरी, नगर येथूनही नाग पकडून आणायचा आणि वर्षभर त्याच नागोबाला घेऊन खेळ करायचा व त्यावरच उदरनिर्वाह करायचा, हे ठरलेले. काळ बदलल्याने समाज बदलतोय.

मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यांची मुले शिकत आहेत. मदारी समाज महासंघाच्या माध्यमातून अध्यक्ष हाजी अक्रम अली रमजान मदारी, गुलाम फकीर चौधरी, बशीर बाबामियाँ, उस्मान मदारी, अब्दूल खालिफ मदारी, अस्लम मदारी, जाकीर चौधरी, हुसेन मदारी, सल्लाउद्दीन मदारी सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. 

अक्रम मदारी म्हणाले, ‘‘सापावर अगदी मुलांप्रमाणे आम्ही प्रेम करतो.
परंतु, आता साप पाळता येत नाही. त्यामुळे जुन्या लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्‍न भेडसावतोय. त्यामुळे समाजातील नागरिक एकत्रित येऊन, त्यांना आर्थिक मदत करतो. दहावीपर्यंत बहुतांश मुला-मुलींचे शिक्षण झाले आहे. इच्छा असेल तर ते उच्चशिक्षणही घेतात. परंतु, मुलींनी नोकरी करणे समाजात अशुभ मानले जाते. तरीही उच्च शिक्षण घेतलेल्या दोन मुली सिंगापूरला गेल्या आहेत. समाजापुरताच रोटी-बेटीचा व्यवहार होतो. तरुण-तरुणी उच्चशिक्षित व्हावेत, म्हणून शासनाने सहकार्य करायला हवे. वस्तीच्या बाजूला पालिकेने शाळा बांधून द्यावी. तसेच शासनाने जागा दिल्यास तेथे सर्पमित्रांसाठी प्रशिक्षण केंद्रही सुरू करता येईल.’’

नागाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवावा
सण-उत्सवात विविध देवतांप्रमाणे प्राण्यांचीही पूजा सांगितली आहे. नागपंचमीला पाटावर गंधाने नऊ नागकुळे काढून त्याचे पूजन करावे. दूध, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवावा. मातीच्या अथवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या नागाच्या मूर्तीची पूजा करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

मातीच्या नागाच्या मूर्तीला पाणी लागल्यास लगेच विरघळते. मातीही आता मिळत नाही. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीच कुंभार बनवितात. वीस ते चाळीस रुपयांपर्यंत नागाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
- अमिना शिकीलकर, विक्रेत्या

माझ्या लहानपणी गारुडी जिवंत नाग घेऊन येत होते. परंतु, ही प्रथा बंद झाल्याने नागांचे आणि पर्यावरणाचे संवर्धनच होत आहे. त्यामुळे माती, पीओपीची नागाची मूर्ती किंवा पाटावर गंधाने नागकुळे काढून नागाची पूजा करता येते. माझे मागच्याच वर्षी लग्न झाले. तेव्हापासून पीओपीच्या नागाच्या मूर्तीची पूजा करते. माझ्यासारख्या तरुणींनीही अशापद्धतीने पूजन केल्यास पर्यावरणाचेही रक्षण होईल.
- आरती देसाई,  इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर 

Web Title: pune news nag panchami