दाभोलकर, पानसरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा - कार्ल्स टोर्नर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, साहित्यिक एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या वैचारिक पार्श्वभूमीतून झालेल्या आहेत. याप्रकरणी हल्लेखोर, सूत्रधार अद्याप सापडत नसून, विचारावंतांवरील हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. विचारवंतांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय लेखक आणि कवींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेन इंटरनॅशनल संघटनेचे अध्यक्ष कार्ल्स टोर्नर यांनी पत्रकार परिषदेत केली.

लेखक, कलाकार, पत्रकार यांना अजूनही अभिव्यक्ती हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. जगभरात लेखक, पत्रकार यांच्यावरील हल्ल्यासंबंधीची नऊशे प्रकरणे प्रलंबित आहेत, असेही त्यांनी नमूद केले. साहित्यिक गणेश देवी, शैला दाभोलकर, उमा पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) चे मिलिंद देशमुख उपस्थित होते. 

देवी म्हणाले,‘‘चार विचारवंतांच्या हत्या या केवळ मानवी हत्या नाहीत, तर त्या वैचारिक हत्या असून, सध्याचे सरकारला त्याचे दुःख वाटत नाही. नैतिक शक्तीपुढे राजकीय शक्तीचा उद्दामपणा पराजित होतो, हे इतिहासात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी दाखवून दिले आहे. सत्तेला आव्हान देण्याची नैतिक शक्ती नागरिकांमध्ये असून, नागरिक काही बोलत नसले तरी, ते योग्यवेळी स्वतःची भूमिका घेऊन प्रस्थापितांना धक्का देतात.’’ 
दाभोलकर म्हणाल्या, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाली; परंतु मारेकरी सापडले नाहीत, ही शोकांतिका आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणत्याही नागरिकाचा आवाज, विचार दाबला जाऊ शकत नाही. मारेकरी व सूत्रधार मिळावे यासाठी नागरिकांनीच सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.’’ 

‘‘ज्या दोन जणांना पकडण्यात आले होते, त्यांची सुटका करण्यात आली हा आमच्यावर अन्याय आहे,’’ असे मत उमा पानसरे यांनी व्यक्त केले.

Web Title: pune news narendra dabholkar govind pansare justice