आजपासून रंगणार पाचदिवसीय नाट्यमहोत्सव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पुणेकरांना मिळणार दर्जेदार नाटकांची मेजवानी; ‘सकाळ’तर्फे आयोजन 

पुणे - मराठी रंगभूमीचा चाहता असलेल्या पुणेकरांनी नेहमीच नाट्यमहोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच सकाळ माध्यम समूहातर्फे यंदाच्या वर्षीही पुणेकरांसाठी पाच खास नाटकांचा समावेश असलेल्या विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. ८ ते ११ जून व १३ जून रोजी रोज रात्री ९. ३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होणार आहेत. 

पुणेकरांना मिळणार दर्जेदार नाटकांची मेजवानी; ‘सकाळ’तर्फे आयोजन 

पुणे - मराठी रंगभूमीचा चाहता असलेल्या पुणेकरांनी नेहमीच नाट्यमहोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच सकाळ माध्यम समूहातर्फे यंदाच्या वर्षीही पुणेकरांसाठी पाच खास नाटकांचा समावेश असलेल्या विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. ८ ते ११ जून व १३ जून रोजी रोज रात्री ९. ३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होणार आहेत. 

पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथील चाहत्यांनी नेहमीच दर्जेदार नाटकांना डोक्‍यावर घेतलेले आहे. अशा नाटकांची मेजवानी पुणेकरांना मिळावी म्हणून सकाळतर्फे विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या पाच विशेष नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रेक्षक व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेले व मुक्ता बर्वे व अजय पुरकर यांची भूमिका असलेले ‘कोडमंत्र’ हे नाटक (८ जून)ला होणार आहे. प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांचे विनोदी नाटक ‘साखर खाल्लेला माणूस’ (९ जून), स्पृहा जोशी व उमेश कामत यांचे ‘डोण्ट वरी बी हॅपी’ (१० जून), जितेंद्र जोशी व गिरिजा ओक - गोडबोले यांचे ‘दोन स्पेशल’ (११ जून), मुलगी व वडिलांचे नाते उलगडणारे प्रशांत दामले व तेजश्री प्रधान यांचे ‘कार्टी काळजात घुसली’ (१३ जून) अशा पाच नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. 

सिझनल पास आणि प्रतिदिन पास असे दोन प्रकारचे तिकीट उपलब्ध असून, सिझनल तिकीट (पाचही नाटक) रू.१२०० तर प्रतिदिन तिकीट रू. ३०० रुपये, बाल्कनी रू.२५० (प्रत्येकी एक नाटक) असे तिकिटांचे स्वरूप असून, काही जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पीएनजी ज्वेलर्स असून, सहप्रायोजक एसटीए हॉलीडेज, निरामय वेलनेस सेंटर आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड हे आहेत. 

मागील वर्षी झालेल्या या नाट्यमहोत्सवाला पुणेकर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदाही नावाजलेल्या नाटकांची पाचदिवसीय मेजवानी पुण्यातील रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
- सुशील जाधव, झोनल हेड, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पुणे हे नाटकाची पंढरी आहे. दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून हा उपक्रम सकाळ माध्यम समूह करत आहे, तो खरोखरच स्तुत्य आहे. याला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचे नाट्यमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातही करायला हवेत.
- अजित सांगळे, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटीए हॉलीडेज

नाटक हा मराठी माणसाचा श्वास आहे. नाटकात मनोरंजनालाच प्राधान्य असते. धकाधकीच्या जीवनात हास्यविनोदाचे चार क्षण अशा नाटकामुळे निर्माण होतात. पण सद्यस्थितीवर भाष्य करण्याचे कामही नाटक करते. वर्तमानामध्ये अडकून न राहता भविष्याचाही वेध घेते. ‘निरामय’ देखील व्यक्तीच्या वर्तमान आरोग्यावर काम करून सर्वांचे भविष्य सुखी आणि आरोग्यदायी असावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
- डॉ. योगेश चांदोरकर, निरामय वेलनेस सेंटर

 कधी : ८ जून  ते ११ जून २०१७ आणि १३ जून 
 कोठे : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
 केव्हा : रोज रात्री ९. ३० वा.  
 ऑनलाइन बुकिंग : www.ticketees.com, www.bookmyshow.com
 अधिक माहितीसाठी क्रमांक : ९१४६६०२५५७

Web Title: pune news natyamahotsav