शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत विविध वस्तू विक्रीला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - अवघ्या दोन दिवसांनी आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला गुरुवारी (ता. 21) शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यामुळे घटासाठी लागणारी वावरी (काळी माती), परडी, घट (सुगडे), कापसाची माळावस्त्रे, रेशमी वस्त्रांसहित पूजेचे साहित्य, रांगोळी, नारळ, नऊ प्रकारची धान्य, विड्याची पाने अन्‌ फुलांनी बाजारपेठेत बहर आणली आहे. 

पुणे - अवघ्या दोन दिवसांनी आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला गुरुवारी (ता. 21) शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यामुळे घटासाठी लागणारी वावरी (काळी माती), परडी, घट (सुगडे), कापसाची माळावस्त्रे, रेशमी वस्त्रांसहित पूजेचे साहित्य, रांगोळी, नारळ, नऊ प्रकारची धान्य, विड्याची पाने अन्‌ फुलांनी बाजारपेठेत बहर आणली आहे. 

हस्त नक्षत्रावर शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी (दसरा) पर्यंत गुजराती, मारवाडी, राजस्थानी तसेच महाराष्ट्रातील नागरिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. प्रथा-परंपरेनुसार घटस्थापना, जागरण-गोंधळ, गरबा-दांडिया यांसारखे कार्यक्रमही पाहायला मिळतात. सार्वजनिक मंडळांमार्फतही देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. म्हणूनच सोन्या-चांदीच्या पेढ्यांवरही दागिन्यांना झळाळी करून देण्यात येत असून, नवे दागिने, देवाचे टाक करण्यात कारागीर व्यग्र आहेत. 

ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, चतुःशृंगी देवस्थान, भवानी माता, संतोषी माता, पद्मावती देवी, काळी जोगेश्‍वरी, पिवळी जोगेश्‍वरी यांसारख्या विविध ठिकाणच्या देवीच्या मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

महात्मा फुले मंडईमध्येही विविध वस्तूंच्या पथाऱ्या मांडल्या आहेत. 

विक्रेत्या अमिना शिकिलकर म्हणाल्या, ""शहरात बाराबलुतेदार पद्धत लोप पावली आहे. आतातर घटाला काळी मातीही विकत घ्यावी लागते. घट, मंडपी, माळेसाठी रंगीबेरंगी नाडा, नऊ प्रकारच्या धान्यांच्या पुड्या, कुंकवाचा करंडा, खारीक-खोबरे यांसह नारळ व अन्य पूजेच्या साहित्याला नागरिकांकडून मागणी असते.'' 

विक्रेते सतीश भंडारी म्हणाले, ""अनेक जण घरगुती पद्धतीने घटस्थापना करतात. त्यासाठी सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य खरेदी करतात. त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळतो.'' 

विक्रेत्या रत्नमाला शिवले म्हणाल्या, ""राजस्थानी, मारवाडी, गुजराती नागरिक रंगीबेरंगी घट खरेदी करतात; मात्र महाराष्ट्रातील नागरिक काळ्या रंगाच्याच घटांना पसंती देतात. प्रत्येक कुटुंबाची घटस्थापनेची पद्धत वेगळी असते. त्यामुळे मागणीनुसार वस्तूंची खरेदी-विक्री होते.'' 

अशी करा घटस्थापना  
गुरुवारी सूर्योदयापासून माध्यान्ह काळापर्यंत घटस्थापना करता येईल. तत्पूर्वी देवघराला आंब्याच्या डहाळीचे तोरण लावावे. देवापुढे रांगोळी काढावी. कुलाचाराप्रमाणे देवादिकांची पूजा करावी. देवापुढे विड्याचे पान, सुपारी, दक्षिणा ठेवावी. काही कुटुंबीयांकडे अखंड नंदादीप लावण्याचीही पद्धत आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे. आश्‍विन शुद्ध पंचमीला रविवारी (ता. 24) ललिता पंचमी पूजन करावे, तर 27 सप्टेंबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) करावे, असेही दाते यांनी सांगितले.

Web Title: pune news Navratri