"राष्ट्रवादी'त चैतन्यासाठी संवादाचा "उतारा' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - शहर पातळीवर पक्ष संघटना मजबूत करून ती विस्तारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते अजित पवार येत्या पाच जुलैला पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन पक्ष संघटनेत बदल करण्याच्या हालचालीही केल्या जाणार असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक होण्याचा सल्लाही पक्षाच्या नगरसेवकांना दिला जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

महापालिकेतील सत्ता भाजपकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मरगळ आली. निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण सुरूच राहिले असून, त्याचा परिणाम संघटनात्मक बांधणीवर झाल्याची चर्चा आहे. त्यात या निवडणुकीनंतर तटकरे, पवार यांच्यासह पक्षाच्या एकाही नेत्याने पुण्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला नव्हता. त्यालाही पक्षांतर्गत राजकारण जबाबदार असल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर राज्यात पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी तटकरे आणि पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानिमित्ताने येत्या पाच जुलैला तटकरे आणि पवार हे पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी राज्यातील पक्षाचे नेते, माजी मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

पुणे-सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजता हा मेळावा होणार असून, विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात आले. पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण म्हणाल्या, ""राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पक्ष संघटना मजबूत करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तटकरे आणि पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, नगरसेवकांचा मेळावा होणार आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष विस्तारण्याच्या दृष्टीने नियोजन करणार आहे.'' 

शंभर दिवसांचा हिशेब मागणार? 

महापालिकेतील सत्तेचा ताबा घेऊन भाजपला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात केवळ घोषणाबाजी आणि पक्षांतर्गत वाद पालिकेत आणण्याशिवाय भाजपने काहीही केलेले नाही. तोडफोड करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले. भाजपचे नेते विकासाच्या गप्पा मारून पुणेकरांची दिशाभूल करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सत्तेच्या शंभर दिवसांच्या कामांचा राष्ट्रवादी हिशेब मागणार असल्याचे पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले. 

Web Title: pune news ncp