शिक्षण, ज्ञान ही प्रभावी आयुधे - डेव्हिड सायम्ली

एनडीए - १३३व्या तुकडीतील अव्वल विद्यार्थी. (डावीकडून) गुरुवंशसिंग गोसल, राहुल बिष्ट आणि अनमोल अग्रहारी.
एनडीए - १३३व्या तुकडीतील अव्वल विद्यार्थी. (डावीकडून) गुरुवंशसिंग गोसल, राहुल बिष्ट आणि अनमोल अग्रहारी.

पुणे - ‘‘सातत्याने अद्ययावत केलेले ज्ञान आणि शिक्षण ही आधुनिक काळात सर्वांत प्रभावी आयुधे आहेत,’’ असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हिड सायम्ली यांनी व्यक्त केले. ‘‘आपल्या ज्ञानाचे परिवर्तन प्रत्यक्ष कृतीमधून झाले पाहिजे,’’ अशी अपेक्षाही त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) विद्यार्थ्यांसमोर बोलताना व्यक्त केली.

‘एनडीए’च्या १३३व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. ‘एनडीए’तून १४८ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बुधवारी प्रदान करण्यात आली. विज्ञान शाखेतील ५६ विद्यार्थी, १४६ संगणक विज्ञान, तर कला शाखेतील ४६ विद्यार्थ्यांना पदवी मिळाली. तसेच, मित्र राष्ट्रांमधील बारा विद्यार्थ्यांनाही यात पदवी दिली. ‘एनडीए’चे प्रमुख एअर मार्शल जे. एस. क्‍लेर, उपप्रमुख रिअर ॲडमिरल एस. के. ग्रेव्हल या वेळी उपस्थित होते. डिव्हिजन कॅडेट कॅप्टन गुरुवंश सिंग गोसल याने विज्ञान शाखेत अव्वल क्रमांक मिळविला. बटालियन कॅडेट ॲज्युनंट अनमोल अग्रहारी याने संगणक विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, डिव्हिजन कॅडेट कॅप्टन राहुल बिष्ट याने कला शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. 

सायम्ली म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून लष्कराचे हजारो अधिकारी निर्माण झाले आहेत. तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणातून देशाची जमीन, आकाश आणि समुद्र सीमांचे रक्षण करण्याचे धडे मिळतात. ‘एनडीए’तून फक्त लष्करी अधिकारीच नाही, तर विद्वानही निर्माण होतात.’’

राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रबांधणी यांतील आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण होणे आवश्‍यक आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘सातत्याने शिकण्यातून ही क्षमता निर्माण होईल. त्याला अनुभवाची जोड पाहिजे. देशांतर्गत सुरक्षा आणि जागतिक सुरक्षेचे आव्हान पेलण्याची क्षमता नेहमीच तुमच्यामध्ये असली पाहिजे. सततच्या सरावातूनच आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहण्याची क्षमता निर्माण होते.

युद्धातील वेगवेगळी आयुधे हाताळण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्‍यक असते. सुदृढ आरोग्य, खंबीर मन, सशक्त शरीर आणि आत्मविश्‍वास यातून यश मिळते. पण यासाठी खडतर प्रशिक्षणाची गरज असते.’’

भारत हा सर्वक्षेत्रांमध्ये वेगाने विकास करत आहे. यात तरुणांचे मोठे योगदान आहे. सशस्त्र दलदेखील याला अपवाद नाहीत. सशस्त्र दले ही देशाची समृद्धता दर्शवितात. देशाची सेवा करताना सशस्त्र दलांनी अंगी बाणवलेली शिस्त आणि बांधिलकी समाजासाठी आदर्श ठरत आहे. तुम्ही देशाचा इतिहास आहात, तसेच भविष्य घडविण्याची क्षमताही तुमच्या मनगटांमध्ये आहे.
- डेव्हिड सायम्ली, अध्यक्ष, केंद्रीय लोकसेवा आयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com