पावसाची भुरभुर... चित्तवेधक परेड, जल्लोष!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पुणे - नुकतीच आपली पदवी परीक्षा पार पाडलेल्या विशीतल्या ‘भावी लष्करी अधिकाऱ्यांच्या’ डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन्‌ खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तिपर संगीताचा निनाद आणि सोबतीला कधी नव्हे, ते पावसाच्या हलक्‍या सरींनी चोरपावलांनी केलेलं आगमन... अशा प्रसन्नचित्त वातावरणात ‘एनडीए’च्या १३२व्या तुकडीची ‘पासिंग आउट परेड’ पार पडली.

पुणे - नुकतीच आपली पदवी परीक्षा पार पाडलेल्या विशीतल्या ‘भावी लष्करी अधिकाऱ्यांच्या’ डोळ्यांत, पायांत, फुफ्फुसांत अन्‌ खरंतर नखशिखांत भरलेला एक विलक्षण उत्साह... सिंहगडाच्या डोंगररांगांच्या कुशीत घुमणारा देशभक्तिपर संगीताचा निनाद आणि सोबतीला कधी नव्हे, ते पावसाच्या हलक्‍या सरींनी चोरपावलांनी केलेलं आगमन... अशा प्रसन्नचित्त वातावरणात ‘एनडीए’च्या १३२व्या तुकडीची ‘पासिंग आउट परेड’ पार पडली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल परेड ग्राउडवरचं वातावरण मंगळवारी सकाळी केवळ डोळ्यांत साठवून घ्यावं, असंच होतं! ‘पासिंग आउट परेड’ची इथला प्रत्येक विद्यार्थी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. शैक्षणिक आयुष्य संपवून देशकार्यासाठी त्यांना पुढे नेणारा हा दिवस.

त्यामुळे आजवर शिकलेल्या ज्ञानाची आणि कौशल्याची एक झलक उपस्थितांना दाखविण्याची शिस्तबद्ध तत्परता, या सर्व कॅडेट्‌सच्या देहबोलीत दिसत होती. विद्यार्थ्यांच्या या चित्तवेधक परेडने उपस्थितांना थक्क केलं नसतं तरच नवल. या सगळ्यावर वरकडी केली ती विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने. प्रत्येक जण आपल्या बॅचमेटसोबत सेल्फी काढण्यात मग्न झाला होता.

देशाचा अभिमान असणारी एनडीए या परेडसाठी पहाटेपासूनच सज्ज झाली होती. काहीसं उजाडल्यानंतरच्या हलक्‍याशा गारव्यात या परिसरातील वास्तू आणि आसमंत अधिकच लक्षवेधी वाटत होता. अशा वेळी परेडचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांनी रस्ते भरून गेले होते. सोबतीला पावसाची सुखद भुरभुर परेडच्या आधीच मनातून ‘वाह’ची प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत होती.

व्ही. एस. सैनी हा विद्यार्थी प्रेसिडेंट्‌स गोल्ड मेडलचा मानकरी ठरला, तर संयम द्विवेदी हा सिल्व्हर मेडल आणि आकाश के. आर. हा ब्राँझ मेडल विजेता ठरला. त्यांना भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

एनडीएचे कमांडंट एयर मार्शल जसजित सिंग क्‍लेर, रिअर ॲडमिरल एस. के. ग्रेवाल, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल कमांडिंग ऑफिसर इन चीफ लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिझ, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्‍ला, महापौर मुक्ता टिळक आदी या वेळी उपस्थित होते.

पाऊस आणि परेड
आपल्या सोबतीला पाऊस भरून आणलेले काळे ढग डोंगरांवर पहुडायला जणू परस्परांशी स्पर्धाच मांडत होते आणि या नितांत सुंदर पार्श्वभूमीवर परेड सुरू झाली होती. एकाच लयीतला पदन्यास, स्थिर पण तीक्ष्ण नजर आणि नियंत्रित हालचालींचा उच्चतम नमुना दाखवून देणारी! एनडीएचं प्रशिक्षण काय असतं, याची प्रचिती हा चित्तवेधक सोहळा पाहताना पावलोपावली येत होती.

सुपर डिमोना विमान, सारंग हेलिकॉप्टर
तीन वर्षांत सर्वोत्तम ठरलेल्या कॅडेट्‌सचा गौरव केल्यानंतर परेड सुरू होताना उंच आकाशात सूर मारत झेपावणारी हेलिकॉप्टर आणि ‘सुपर डीमोना’ ही खास विमानं पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. विशेषतः त्यानंतरच्या कालावधीत सारंग हेलिकॉप्टर्सच्या पथकाने जी थरारक प्रात्यक्षिके दाखवली, ती पाहताना अनेकांच्या नजरा आकाशावरून काही केल्या हटतच नव्हत्या! परेडच्या देखण्या पार्श्वभूमीवर सतत बॅंडच्या सुरेल तालावर ऐकू येणाऱ्या ‘हम एनडीए के कॅडेट हैं’... ‘सारे जहाँ से अच्छा’... ‘देशो का सरताज भारत’... या धून ऐकताना मन प्रसन्न होत होतं.

चारचाकीतून स्वीकारली सलामी!
घोड्यांच्या पारंपरिक बग्गीमधून प्रमुख पाहुणे ॲडमिरल सुनील लांबा यांचं आगमन झालं. अनेकांचे डोळे या विशेष आगमनाकडे लागून राहिले होते. मंचावर आल्यानंतर लांबा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. त्याआधी त्यांनी कमांडंट क्‍लेर यांच्या सोबतीने संपूर्ण परेडची सलामी एका खास चारचाकीतून जात स्वीकारली. हे सारं लष्कराच्या शिस्तीत आणि नियोजनबद्धरीतीने घडत होतं. परेड संपल्यानंतर ॲडमिरल लांबा यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेटही घेतली.

Web Title: pune news nda passing out parade