आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा

स्वप्नील जोगी
मंगळवार, 30 मे 2017

खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठिण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे.

पुणे : आपल्यासाठी देश प्रथम असायला हवा, हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा. देशाची सेवा करताना कोणताही प्रयत्न लहान नाही आणि कोणतेही योगदान अत्युच्च नाही! सेवा परमो धर्महा हा मंत्र कधीही विसरू नका आणि मानवतेसाठी सदैव सज्ज राहा, असे प्रेरणादायक भाषण भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी एनडीएतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर केले. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) पासिंग आऊट परेड आज (मंगळवार) सकाळी पार पडली. यावेळी पावसाच्या सरी कोसळल्या, तरीही नागरिकांनी ही परेड पाहण्यासाठी गर्दी केली होती.

नौदल प्रमुख सुनील लांबा म्हणाले, की सर्व कॅडेट्सचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. यात तेवढाच महत्त्वाचा वाटा तुमच्या आई वडिलांचा सुद्धा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठिणातील कठिण आव्हानासाठी सज्ज करत असते, हे लक्षात ठेवा. शिस्त, धाडस, चिकाटी यांना पर्याय नाही. तुम्हाला पुढील आयुष्यभर याचा उपयोग होणार आहे. चूक काय आणि बरोबर काय, यातील फरक काय, हे ताडून पाहणे तुम्हाला नेहमी जमायला हवे. येत्या आव्हानाचा काळात सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचा खरा वाटाड्या असेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू कराल. अशावेळी तुमच्यात काही व्यावसायिक मूल्ये विकसित होणे आवश्यक ठरेल. पण एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावायला सज्ज व्हा. तुम्हाला शुभेच्छा! जय हिंद.

Web Title: pune news NDA passing out parade navy chief sunil lanba