चिक्की व्यावसायिकांना ‘जीएसटी’ नाही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पिंपरी - लोणावळ्यातील चिक्‍की व्यावसायिक वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) भरणा करत नसल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गेली, त्यानंतर प्रशासनाने या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश वस्तू आणि सेवा कर विभागाला दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

पिंपरी - लोणावळ्यातील चिक्‍की व्यावसायिक वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) भरणा करत नसल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गेली, त्यानंतर प्रशासनाने या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश वस्तू आणि सेवा कर विभागाला दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून या कराचा भरणा कोण करते आणि कोण करत नाही, याकडे अनेकजण बारकाईने लक्ष देत आहेत. त्यामुळेच की काय, काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील चिक्‍की व्यावसायिकांकडून जीएसटीचा भरणा केला जात नसल्याची तक्रार थेट पंतप्रधानांच्या दारात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने, त्या भागातील व्यापाऱ्यांनी जीएसटीचा नोंदणी क्रमांक घेतला आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश वस्तू आणि सेवा कर विभागाला दिले. त्यानंतर वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

दरम्यान, लोणावळ्यातील चिक्‍की व्यावसायिकांमध्ये जीएसटी संदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. चिक्‍की हा खाद्यपदार्थ नेमका मिठाईमध्ये येतो, की अन्य कशामध्ये, यामुळे या कराची आकारणी कशी करायची या संदर्भात हे व्यावसायिक गोंधळात आहेत. त्यामुळे या परिसरातील काही व्यापारी पाच टक्‍के, तर काहीजण १२ टक्‍के जीएसटीची आकारणी करत आहेत. वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली, त्या वेळी ही माहिती समोर आल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

लोणावळा परिसरातील चिक्‍कीच्या व्यवसायात मोठी उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी जीएसटी नोंदणी क्रमांक घेतला आहे की नाही, याची छाननी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असता, त्यामध्ये अनेकांनी जीएसटी नोंदणी क्रमांक घेतल्याचे दिसून आले आहे. या व्यावसायिकांमध्ये कराबाबत असणारा नेमका संभ्रम लवकरच दूर करण्यात येणार असल्याची माहिती वस्तू आणि सेवा कर विभागातील सूत्रांनी दिली.

सात नोव्हेंबरला परिसंवाद....
लोणावळ्यातील चिक्‍की व्यावसायिकांना जीएसटी संदर्भातील माहिती विस्तृतपणे समजावी, करासंदर्भात त्यांच्या असणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, म्हणून येत्या सात नोव्हेंबर रोजी वस्तू आणि सेवा कर विभागातर्फे लोणावळ्यामध्ये परिसंवाद घेण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कर विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादात वस्तू आणि सेवा कराची विभागणी कशी करण्यात आलेली आहे. कोणत्या वस्तूंसाठी किती जीएसटी आहे, याची सविस्तर माहिती या वेळी देण्यात येणार आहे.

Web Title: pune news no GST chikki business