त्यांचे मंत्रिमंडळात कोणी ऐकत नाही - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - 'पुण्याच्या भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांचे मंत्रिमंडळात कुणीही ऐकत नाहीत. ही मंडळी केवळ नाष्टापाणी करण्यासाठीच मुंबईला जातात का?,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. महापालिका निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही पुण्याचा एकही प्रश्‍न सोडविता आला नसल्याचे सांगत, पवार यांनी भाजपच्या कारभारावर बोट ठेवले.

पक्षाच्या वतीने आयोजित शहरातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यासह महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यात समन्वय नाही, असा टोलाही लगावत, "मी पालकमंत्री असताना त्या वेळच्या महापौरांशी नियमित चांगला संवाद होता,' असे सांगायलाही पवार विसरले नाहीत.

पवार म्हणाले, 'शहरातील सर्व विधानसभा मतदासंघांत भाजपचे आमदार निवडून आले, त्यातून एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री झाले, महापालिका, राज्य आणि केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. मात्र, पुणेकरांची कामे मार्गी लागत नाहीत. सत्ताधारी पक्षातील काही मंडळी सार्वजनिक हिताच्या जागा हडप करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही.''

'शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या 34 गावांचा प्रश्‍नही सुटलेला नाही. शहरात चांगल्या योजना राबविण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. मेट्रो अजूनही यार्डातच आहे. त्यासाठी जागा मिळत नाही. कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. स्मार्ट सिटीची घोषणा नावापुरतीच आहे,'' अशी टीका पवार यांनी केली.

सत्तेला चिकटलेले मुंगळे
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष 15 वर्षे सत्तेबाहेर राहिले. त्यामुळे सेना व भाजपचे फक्त "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो,' असं सुरू आहे. सत्तेच्या ढेपेला चिकटलेले हे मुंगळे आहेत. ते सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत,'' अशा शब्दांत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्षांवर निशाणा साधला.

पवार म्हणाले, 'एखाद्या प्रश्‍नाबाबत मुख्यमंत्री केवळ "लक्ष घातले आहे, अभ्यास सुरू आहे, समिती नेमणार आहे,' अशी उत्तरे देतात. मुख्यमंत्री ठोस काहीही करीत नाहीत. कोणत्याही निर्णयानंतर त्यात काहीतरी त्रुटी राहतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गोंधळ वाढतो आहे. मुंबईत शेतीच नसताना तेथे शेतकरी हवेतून येतात का?''

Web Title: pune news No one listens in their cabinet